‘क्रूर महिला पुन्हा सत्तेत आली’, बाबुल सुप्रियो यांनी खळबळजनक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

मी ममता बॅनर्जींना शुभेच्छाही देणार नाही, तसंच जनमताचा आदर करतो, असंही म्हणणार नाही. भाजपला संधी नाकारुन, बंगालच्या जनतेने ऐतिहासिक चूक केलीय, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भ्रष्ट, असमर्थ, लबाड सरकारला निवडलं असून क्रूर महिला पुन्हा सत्तेमध्ये आली आहे अशी वादग्रस्त पोस्ट बाबुल सुप्रियो यांनी लिहिली आहे.

    कोलकात्ता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं आहे. पंतप्रधान मोदींसह देशातील अनेक नेत्यांनी विजयाबद्दल ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत. पण पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी विजयी उमेदवार किंवा पक्षाला शुभेच्छा देण्याची परंपरा खंडीत केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देण्यास नकार दिला आहे. उलट टीका करताना अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

    बाबुल सुप्रियो यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याचं म्हटलं असून ममता बॅनर्जींना क्रूर महिला’ ठरवलं आहे. “मी ममता बॅनर्जींना शुभेच्छाही देणार नाही, तसंच जनमताचा आदर करतो, असंही म्हणणार नाही.” “भाजपला संधी नाकारुन, बंगालच्या जनतेने ऐतिहासिक चूक केलीय, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भ्रष्ट, असमर्थ, लबाड सरकारला निवडलं असून क्रूर महिला पुन्हा सत्तेमध्ये आली आहे” अशी वादग्रस्त पोस्ट बाबुल सुप्रियो यांनी लिहिली आहे.

    “कायदा पाळणारा नागरिक या नात्याने लोकशाही देशातील जनतेने घेतलेल्या निर्णयाचे मला पालन करावे लागेल” असं सुप्रियो यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींपासून राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील विजयाच्या हॅट्रिकबद्दल ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे.