ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मेपासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. कारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती. याप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते.

    ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर राणाच्या मृत्यू प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले.याबाबतची माहिती दिल्ली पोलीस विशेष सेलचे आयुक्त नीरज ठाकूर यांनी दिली आहे.

     

    दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ मेपासूनच सुशील कुमारच्या शोध सुरू केला होता. कारण मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती. याप्रकरणी सुशील कुमारविरोधात काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. मारहाण आणि हत्या झालेल्या छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार आपल्या २० ते २५ साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार सागर आणि अन्य दोन व्यक्तींना हॉकी स्टिकने मारहाण करताना करत असल्याचं दिसत असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबनेही हा व्हिडीओही खरा असल्याचं म्हटलेलं आहे.