delhi police rescues 15 year old girl after 35 day long operation

राजौरी गार्डन पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी मेवात येथे येऊन ३५ दिवस वेषांतर करून राहिले आणि अपहरण केलेल्या मुलीचा कसून शोध घेतला. ही मुलगी पोलिसांना बदरपूर सीमोवर आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तैयब हुसैन याला अटक केली आहे.

नवी दिल्ली : अपहरण झालेल्या एका १५ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेण्यासाठी पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मेवात मध्ये ३५ दिवस राहून वेषांतर करून या मुलीचा कसून शोध घेतला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्या मुलीला बदरपूर सीमेजवळून ताब्यात घेतलं सोबतच या मुलीला फूस लावून सोबत घेऊन जाणाऱ्या आरोपीच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपीचे नाव तैयब हुसैन आहे. तैयबने आपली ओळख लपवत राजौरी गार्डन परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या एका मुलीशी फेसबुकवर मैत्री केली. आरोपी मेवातच्या गोविंदगड परिसरातील रहिवाशी आहे. २३ ऑक्टोबरला या मुलीला फूस लावून त्याने बिहारच्या मुजफ्फरपूर येथे आणले. येथून तो आझमगड येथील मित्राकडे काही दिवस राहिला.

येथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अनेक ठिकाणं बदलत अखेर आपल्या गावी मेवातमध्ये दाखल झाला. या दरम्यान राजौरी गार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शर्मा यांनी दाखल झालेल्या तक्रारीवरून या मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद घेत त्या दिशेने तपास सुरू केला. तपास सुरू असताना तैयब मेवातमध्ये असल्याची माहिती मिळाली. यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधणे आणि तेथून अपहरण झालेल्या मुलीविषयी माहिती मिळवण्याच्या कामी पाठविण्यात आले.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ३५ दिवस वेषांतर करून मेवात येथे अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यानंतर ८ डिसेंबरला त्या मुलीला बदरपूर सीमेजवळ ताब्यात घेतले. आरोपीलाही अटक करण्यात आली या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आणि हवालदार शौकत यांनी मोलाची कामगिरी करत मुलीला ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

आरोपीने स्वत:ची खरी ओळख लपवत माझ्याशी मैत्री केली. त्यानंतर तो या मुलीला दूर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिच्याशी बळजबरीने विवाह करण्याचा प्रयत्नही केला अशी माहिती या मुलीने पोलिसांना दिली. या कामात आरोपीच्या आई-वडिलांनाही त्याला मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.