गाफील राहू नका…भारतात थैमान घालत असलेल्या कोरोनाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेली ही माहिती सर्वांसाठी महत्वाची…

भारतात कोरोनाग्रस्तांची (India COVID 19 Positive Patients)संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशात आता दररोज सुमारे ९० हजार रुग्ण आढळून येत आहेत. इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया जोरात राबवित आहे. दरम्यान, नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. अनेकांना वाटत आहे की देश लवकरच हर्ड इम्युनिटीजवळ जाईल मात्र असं नाहीए. कारण, आपण अद्याप हर्ड इम्युनिटीपासून (Herd Immunity) भारत खूप दूर आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan )यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनापासून धोका होऊ नये म्हणून अधिकाधिक सुरक्षा बाळगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे. ‘संडे संवाद’ या सोशल मीडियावरील चर्चेदरम्यान ते लोकांशी बोलत होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली आहे.ज्यात असे दिसून आले आहे की, कोविड-१९साठी हर्ड इम्युनिटी मिळवण्यापासून भारत अद्याप फार दूर आहे, त्यामुळे लोकांनी कोरोनापासून बचावासाठी सर्व उपाययोजना करायला हव्यात. तसेच कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संक्रमण होते की नाही याबाबत सविस्तर शोध घेतला जात आहे. आजपर्यंत याचे नगण्य प्रकरणं समोर आली आहेत. सरकार याबाबत पूर्णपणे लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर आयसीएमआरची (ICMR)टीम देखील यावर काम करीत आहे,” असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.