अनिल अंबानींसमोर नवे संकट, दूरसंचार विभागाचा रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या परवाना नुतनीकरणाला नकार

दूरसंचार मंत्रालयाने अनिल अंबानी(Anil Ambani) यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (Reliance Communications) परवाना नुतनीकरणाला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई: उद्योजक अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. दूरसंचार मंत्रालयाने अनिल अंबानी(Anil Ambani) यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (Reliance Communications) परवाना नुतनीकरणाला नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत कंपनी थकबाकी अदा करत नाही तोपर्यंत Reliance Communications च्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, अशी अटच दूरसंचार मंत्रालयाने घातली आहे.

    रिलायन्स कम्युनिकेशन्सने तब्बल 26 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आता हे पैसे भरले नाहीत तर रिलायन्स कम्युनिकेशनला त्यांच्याकडील स्पेक्ट्रमवरील (दूरसंचार लहरी) हक्कही सोडून द्यावा लागेल. तसे घडल्यास रिलायन्स कम्युनिकेशन्सला आपली मालमत्ताही गमवावी लागेल. त्यामुळे कंपनीच्या दिवाळखोरीची प्रक्रियाही ठप्प होऊन अनिल अंबानी यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिलायन्स कम्युनिकेशनकडे सध्या देशातील 22 सर्कल्समधील स्प्रेक्ट्र लहरी आहेत. यापैकी 14 स्पेक्ट्रम 850 मेगाहर्टझचे आहेत.

    कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले 160 कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात सूचित करण्यात आले असून त्यामुळे अनिल अंबानी  यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

    कर्नाटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही 2014 पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा 0.39 टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये 1.98 टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी 100 टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आले.