गुजरातमध्ये कोरोनाचे चटके बसू लागले: नोकरी गेल्यानंतर आर्थिक तंगी भेडसावणाऱ्या महिला झाल्या सरोगेट मदर्स; अविवाहित युवतींनीही गर्भाशय भाड्याने दिली

संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांनी हा मार्ग अवलंबला आहे. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, यात काही अविवाहित महिलांचाही समावेश आहे. याच्या मोबदल्यात त्यांना ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च मिळतो आहे. जाणून घ्या त्यांची आपबीती...

  पूर्व अहमदाबादेत एक २३ वर्षीय तरुणी घराघरांत कामासाठी जात होती, पण कामच बंद झाल्याने तिच्यासमोर संसाराचा गाडा हाकायचा कसा हा प्रश्न ‘आ’ वासून उभा ठाकला. कोणीतरी तिला सरोगेट मदर होण्याचा सल्ला दिला. तिला हा मार्ग योग्य वाटला. आता ती एका दांपत्याच्या बाळाची आई होणार आहे. कोरोनामुळे काम-धंदे बंद पडू लागल्याने नोकऱ्या गमावण्याची वेळ आली. यामुळेच नाईलाजास्तव महिला आपले गर्भाशय भाड्याने देऊ लागल्या आहेत. गुजरातमध्ये अशी २०-२५ प्रकरणे समोर आली आहेत.

  संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांनी हा मार्ग अवलंबला आहे. हैराण करणारी गोष्ट अशी आहे की, यात काही अविवाहित महिलांचाही समावेश आहे. याच्या मोबदल्यात त्यांना ३ ते ४ लाख रुपये आणि वैद्यकीय खर्च मिळतो आहे. जाणून घ्या त्यांची आपबीती…

  वडिलांनी आईला आणि मला सोडून दिलं; नोकरी गेल्यानंतर, हाच पर्याय होता

  माझं नाव रिमा आहे. वय २३ वर्ष आहे. अजून हातही पिवळे झाले नाहीत. वडिलांनी मला आणि आईला सोडून दिलं आणि दुसरा संसार थाटला. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. लोकांची घरकामे करुन आईने मला वाढवलं. मी देखील नोकरी करुन हातभार लावण्याचा प्रयत्न करत होते. कोरोना महामारीमुळे माझी नोकरी गेली. आईचं कामही बंद झालं. पैशांची आवक थांबली. घरभाड्याचा बोजा दिवसेंदिवस वाढत होता. घरमालकही वारंवार याची विचारणा करुन दबाव वाढवू लागला होता, म्हणून मग सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या माध्यमातून संतती सुखासाठी इच्छुक असलेल्या दांपत्याशी संपर्क साधला. त्यांनी काही पैसेही दिले आहेत.

  नोकरी गेली, डबे पुरवण्याचे काम सुरू केलं, तेही बंद झालं

  ॲडव्होकेट अशोक परमार सांगतात, त्यांच्या परिचयातील एक राजश्री यांच्या पतीचे निधन झाले. आवक पूर्णपणे थांबली. मुलांसाठी त्यांना ही नोकरी करावी लागली. पण नोकरीही सोडावी लागली. त्यानंतर डबे पुरवण्याचं काम सुरू केलं. लॉकडाऊनमुळे तेही बंद झालं. तेव्हा एका महिलेने तिला सरोगेट मदर होण्याचा प्रस्ताव दिला. मुलांच्या भविष्याचा विचार करता राजश्रीने हा प्रस्ताव स्वीकारला. तथापि, यातून त्यांना घरखर्चासाठी आवश्यक असणारे पैसेही मिळाले. उरलेले पैसे प्रसुती झाल्यावर मिळणार आहेत.

  पतीची नोकरी गेली, घरातली प्रत्येक वस्तू विकावी लागली

  आमदार जी. एस. सोलंकी म्हणतात, रेखा नावाच्या महिलेच्या पतीची नोकरी कोरोना महामारी आल्यानंतर काही दिवसांनी गेली. त्यांना घरखर्च भागवण्यातही अनेक अडचणींचा सामाना करावा लागत होता. घरखर्चासाठी घरातल्या सर्व वस्तू विकाव्या लागल्या. उधार मागूनही पैसे मिळतच नव्हते. पण वस्तू विकूनही फार दिवस गुजराण करणं शक्य नव्हतं. तेव्हा रेखाने तिच्या पतीसमोर गर्भाशय भाड्याने देण्याचा पर्याय ठेवला. काहीच मार्ग दिसत नसल्याने पतीनेही रेखाला सरोगेट मदर होण्याची परवानगी दिली.

  (सर्व महिलांची नावे बदलली आहेत.)

  due to corona women troubled by financial crisis they are becoming surrogate mothers unmarried women also hire womb