केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा – दहावी, बारावीचा निकाल मान्य नसेल तर ऑगस्टमध्ये पुन्हा देता येणार सीबीएसई बोर्डाची लेखी परीक्षा

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी(Tenth Exam Result) आणि बारावीचा निकाल(Twelfth Exam Result) मान्य नसेल, त्या निकालावर समाधान नसेल त्यांच्यासाठी कोरोनाची परिस्थिती पाहून ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा(Exam In August) घेण्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या(Corona) पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या(CBSE Board) परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून मुल्यांकन पद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक(Ramesh Pokhriyal) यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल मान्य नसेल, त्या निकालावर समाधान नसेल त्यांच्यासाठी कोरोनाची परिस्थिती पाहून ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे लेखी परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे .

    रमेश पोखरीयाल निशंक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विद्यार्थी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र, माझ्या प्रकृतीमुळे मला बोलता आले नाही. विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्यांनी कोणतीही काळजी करु नये. विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करुन पंतप्रधान मोदींनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यात त्यांच्या क्षमतांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये ऐच्छिक परीक्षा आयोजित केली जाईल.”

    सर्वोच्च न्यायालयाने देखील सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाला मान्यता दिल्याचं सांगत शिक्षण मंत्र्यांनी न्यायालयाचेही यासाठी आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेची काळजी न करता आपल्या आरोग्याची काळजी करावी, असं आवाहन केलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि क्षमता याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.