धावत्या ट्रेनमध्ये आठ दरोडेखोर आले, लूटमार तर केलीच, पण महिलेच्या पतीसमोर तिच्यावर केला सामूहिक बलात्कार, पुष्पक एक्सप्रेसमधील साक्षीदार महिलेने सांगितला घडलेला प्रकार

८ दरोडेखोरांनी इगतपुरी ते कसारा स्टेशनदरम्यान धावत्या गाडीत प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटले होते. या दरोड्यावेळीच आपल्या पतीसोबत प्रवास करत असलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीवर नराधमांनी, तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे, आता नव्याने समोर आले आहे. यापैकी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : शुक्रवारी लखनौहून मुंबईला जात असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये पडलेल्या दरोड्यावेळी, २० वर्षांच्या तरुणीवर सामूहितक बलात्कार झाल्याची नवी घटना समोर आली आहे. ८ दरोडेखोरांनी इगतपुरी ते कसारा स्टेशनदरम्यान धावत्या गाडीत प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटले होते. या दरोड्यावेळीच आपल्या पतीसोबत प्रवास करत असलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीवर या नराधमांनी, तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे, आता नव्याने समोर आले आहे. यापैकी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    या पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणारे एक साक्षीदार आता समोर आले असून, त्यांनी त्यादिवशी रेल्वेत नेमके काय घडले ते सांगितले आहे. ज्या बोगीत ही बलात्काराची घटना घडली, त्याच बोगीतून हे साक्षीदार प्रवास करत होते. ट्रेनमध्ये चढल्यापासूनच हे आठही दरोडेखोर आक्रमक होते, असे त्यांनी सांगितले आहे. या आठही दरोडेखोरांनी कुठल्यातरी अमली पदार्थाचे सेवन केले होते, त्यामुळे त्याच धुंदीत या दरोडेखोरांनी हा सर्व प्रकार केल्याचा संशयही या साक्षीदाराने व्यक्त केला आहे. स्टेशनवर ट्रेनमध्ये शिरल्यानंतर, या आठही दरोडेकोरांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचेही साक्षीदारांचे म्हणणे आहे. स्टेशन सुटल्यानंतर तर हे दरोडेखोर अधिक आक्रमक झाले, त्यांच्याकडे असलेल्या हत्यारांचा धाक दाखवून, ते प्रवाशांकडून पैशांची मागणी करत होते. त्यांच्याकडे चाकू आणि लाकडी दांडकी होती, त्याचा प्रहार त्यांनी अनेकांच्या डोक्यावर केल्याचेही साक्षीदारांनी सांगितले.

    प्रवाशांना होणारी मारहाण पाहून, या साक्षीदाराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दरोडेखोरांनी साक्षीदाराच्या डोक्यावर टोकदार वस्तूने प्रहार केला, त्यामुळे रक्त वाहायला लागले. त्यामुळे घाबरुन गप्प बसण्याशिवाय पर्याय नसल्याची कबुलीही या साक्षीदाराने दिली आहे. हा साक्षीदार लखनौहून मुंबईकडे प्रवास करत होता. ट्रेन जेव्हा कसारा घाटात पोहचली, या प्रवासात अनेक बोगदेही आहेत. या प्रवासात महिलेशी अश्लील वागणूक करण्यास या दरोडेखोरांनी सुरुवात केली. या महिलेच्या पतीला आणि त्यांना विरोध करणाऱ्या काही प्रवाशांनाही त्यांनी मारहाण केली. एका प्रवाशाला तर त्यांनी ट्रेनमधून फेकण्याचाही प्रयत्न केला. मात्र ट्रेनचा स्पीड कमी असल्याने तो प्रवासी थोडक्यात बचावला. महिलेशी दुष्कृत्य केल्यानंतर, त्यांनी या महिलेला मारहाण केल्याचंही या साक्षीदाराने सांगितले आहे.

    प्रवासांच्या मदतीसाठी आपण काहीही करु शकत नाही, यामुळे असहाय्य वाटत होते, असेही या साक्षीदाराने सांगितले. रेल्वे स्टेशन आल्यावर सर्व प्रवाशांनी आरडोरडा करण्यास सुरुवात केली, मात्र त्यापूर्वीच सहा दरोडेखोर गाडीतून उड्या मारुन पळून गेले होते. इतर दोघांपैकी एकाला पळताना आपण झेप घालून पकडले, इतरही प्रवासी यावेळी मदतीला आले, आणि या दरोडेखोराला डब्ब्यातील टॉयलेटमध्ये सर्वांनी मिळून कोंडले. स्टेशनवर आरडाओरडा ऐकून पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी या आरोपीला अटक केली. रेल्वेमध्ये एवढे प्रवासी असतानाही, या महिलेला दरोडेखोरांच्या तावडीतून वाचवू शकलो नाही, याचे दुख असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.