electricity problem

नुकतीच मुंबईतील वीज गुल झाल्याची बातमी देशभरात चर्चेला विषय बनली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी आजही देशातील अनेक भागांमध्ये २४ तास सुरळीत वीजपुरवठा होत नाही. वीज वितरण आणि वीज वाहून नेण्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, वीज वितरक कंपन्यांना होत असणारे नुकसान, वीजचोरी यांसारख्या अनेक कारणांमुळे आजही अनेक ठिकाणी सलग २४ तास वीज उपलब्ध होत नाही.

दिल्ली: नुकतीच मुंबईतील वीज गुल(electricity issue) झाल्याची बातमी देशभरात चर्चेला विषय बनली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी आजही देशातील अनेक भागांमध्ये २४ तास सुरळीत वीजपुरवठा होत नाही. वीज वितरण(electricity distribution) आणि वीज वाहून नेण्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, वीज वितरक कंपन्यांना होत असणारे नुकसान, वीजचोरी यांसारख्या अनेक कारणांमुळे आजही अनेक ठिकाणी सलग २४ तास वीज उपलब्ध होत नाही. कौन्सिल ऑफ एनर्जी, एनव्हायरमेंट ॲण्ड वॉटरने (सीईईडब्ल्यू) नुकताच स्टेट ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया हा अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये देशातील दोन तृतीयांश गांवामध्ये आणि ४० टक्के शहरी भागांमध्ये दिवसातून किमान एकदा तरी वीजपुरवठा खंडित होतो असे म्हटले आहे.इनिसिएटीव्ह फॉर सस्टेनेबल एनर्जी पॉलिसी म्हणजेच आयएसईपीच्या सहकार्याने सीईईडब्ल्यूने देशातील २१ राज्यांमधील १५२ जिल्ह्यांमधील १५ हजारहून अधिक घरांमध्ये हे सर्वेक्षण केल आहे.

उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक
सीईईडब्ल्यूने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशातील बहुतांश जनतेला वीजकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी ७६ टक्के लोकांनी घरामध्ये अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो असे म्हटले आहे. सतत वीजपुरवठा खंडित होते आणि दीर्घकाळासाठी वीजपुरवठा खंडित होण्यात उत्तर प्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल झारखंड, आसाम, बिहार आणि हरयाणा ही राज्ये आहेत. या राज्यांमध्ये अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि झाल्यास ही समस्या दीर्घकाळ असते असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

फक्त ६ % लोकच करतात तक्रार
देशातील एक तृतीयांश जनतेला वीजपुरवठ्यासंदर्भात आहे त्या परिस्थितीशी जूळवून घ्यावे लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. वीजचे दबाव म्हणजेच व्होल्टेज कमी अधिक झाल्याने वीजपुरवठा खंडित होते, अपुरा वीजपुरवठा, वीजपुरवठ्यामधील अनियमिततेमुळे घरातील उपकरणे खराब होणे यासारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वीज ग्राहकांमध्ये स्वत:च्या हक्कांसंदर्भात जागरुकता दिसून येत नाही. त्यामुळेच केवळ ६ टक्के लोक वीजपुरवठ्यासंदर्भातील प्रकरणांची संबंधित खात्यांकडे तक्रार नोंदवत असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले.

आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे तर सर्वाधिक वीज वापरणाऱ्या देशांच्या यादीतही भारत तिसऱ्या स्थानी आहे. सरकार तसेच राजकीय पक्षांकडून अनेकदा २४ तास वीजपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले जाते. मात्र, असे असतानाही देशातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होणे ही दैनंदिन गोष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे.

नियमित वीजबिल भरणा नाही
ग्राहकांकडून वेळेत वीज बिले भरली जात नसल्यामुळे अनेक वीज वितरक कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. सर्वेक्षणामध्ये ग्रीडच्या माध्यमातून वीजपुरवठा होणाऱ्या एकूण ग्राहकांपैकी ४ टक्के ग्राहकांच्या वीज बिलांच्या देयकामध्ये अनियमितता असल्याचे दिसून येते तर ग्रीडच्या माध्यमातून वीजपुरवठा होणाऱ्या ग्राहकांपैकी ५ टक्के ग्राहकांनी आपल्याला कधी विजेची बिले आलीच नाही असा दावा केला आहे. ग्रीडच्या माध्यमातून वीजपुरवठा करून सर्वांत कमी प्रमाणात वीज बिले भरली जाणाऱ्या राज्यांमध्ये झारखंडची सर्वांत कमी म्हणजे ५५ टक्के हिस्सेदारी आहे. त्या खालोखाल बिहारचा समावेश असून तिथे ही आकडेवारी ६४ टक्क्यांपर्यंत आहे. त्याचबरोबर आसाम, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नियमितपणे वीज बिले भरणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसते.