kolkata

हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या मोटरमनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तीन हत्ती रुळावरून फिरत आहेत, हे पाहिल्यानंतर मोटरमनने ट्रेन थांबवली.

कोलकाता. रेल्वे रुळ ओलांडताना अनेक वन्य प्राण्याचा अपघात होतो. यात बऱ्याचदा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र पश्चिम बंगालमध्ये मोटरमनच्या प्रसांगवधानामुळे तीन हत्तींचा जीव वाचला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याचा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या मोटरमनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तीन हत्ती रुळावरून फिरत आहेत, हे पाहिल्यानंतर मोटरमनने ट्रेन थांबवली. हत्ती रेल्वे रुळ पार करेपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर पुन्हा ट्रेन सुरू केली. मोटरमनने हत्तींचा जीव वाचवल्याबद्दल देशभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

रेल्वे मंत्री गोयल यांनी हा व्हीडिओ शेअर करताना, पश्चिम बंगालमधील शिवोक-गुलाम रेल्वे ट्रॅकवर हत्ती रेल्वे रूळ पार करत होते. यावेळी तत्काळ मोटरमनने ब्रेक दाबत, या हत्तींचा जीव वाचवला. हत्ती सुरक्षित रुळाबाहेर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्रेन सुरू केली, असे नमूद केले आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या मोटरमनचे कौतुक केले जात आहे. तर लोकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.