वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान ९ वर्षांनी होऊ शकते कमी,ईपीआयसी अहवालातील निष्कर्षांमुळे चिंता वाढली

वायू प्रदूषणामुळे(Air Pollution) सुमारे ४०% भारतीयांचे आयुर्मान(Life Expectancy Of Indians Is Reducing) ९ वर्षांपेक्षा कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी याविषयीचा अहवाल (EPIC Report)जारी केला आहे.

    भारतीयांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. वायू प्रदूषणामुळे(Air Pollution) सुमारे ४०% भारतीयांचे आयुर्मान(Life Expectancy Of Indians Is Reducing) ९ वर्षांपेक्षा कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी याविषयीचा अहवाल (EPIC Report)जारी केला आहे. या अहवालात त्यांनी म्हटले आहे की, “नवी दिल्लीसह उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात राहणारे ४८ कोटी लोक प्रदूषित क्षेत्रामध्ये राहतात. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता खूप खराब झाली आहे.”

    प्रदुषण रोखण्यासाठी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं (एनसीएपी) ईपीआयसीने कौतुक केलं आहे. ईपीआयसीच्या अहवालानुसार एनसीएपीच्या नव्या कार्यक्रमामुळे देशाचे एकूण आयुर्मान १.७ वर्षे आणि नवी दिल्लीतील लोकांचे आयुर्मान ३.१ वर्षांनी वाढेल. एनसीएपीचे उद्दीष्ट २०२४ पर्यंत सर्वात प्रदुषित १०२ शहरांमध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी करणे असे आहे. यासाठी औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये कपात, वाहतूक इंधन आणि बायोमास जाळण्यासाठी कडक नियम लागू करणे आणि धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी काम करणे, याचा समावेश आहे.या कामांसाठी चांगल्या मॉनिटरिंग सिस्टिम लागेल.

    २०२० मध्ये सलग तिसऱ्या वर्षी नवी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी होती. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात नवी दिल्लीच्या २ कोटी लोकांनी प्रदुषणरहित स्वच्छ श्वास घेतला. त्यानंतर जवळच्या पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी शेतातील तण जाळल्यामुळे पुन्हा हिवाळ्यात दिल्लीतील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आयुर्मानाची आकडेवारी काढण्यासाठी ईपीआयसीने दीर्घकालीन वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांना सामोरे जाणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तुलना केली होती.