परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही : सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने निकाल देताना यूजीसीच्या (UGC) अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी (Final Year Exam) आज शुक्रवार सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिक्षांची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना यूजीसीच्या (UGC) अधिकारांवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू शकतात. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच ३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा घेणं अनिवार्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने निकालात सांगितलं आहे.