‘फेसबुक लाईव्ह’ करणं पडलं महागात ; दोन तरुणांना गमवावा लागला जीव

सेल्फी, सोशल मीडिया स्टेटस, लाईव्ह यांच्या नादात कुणी जीव गमावण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. नागरिकांनी आपले प्राण धोक्यात टाकून असे प्रकार करू नयेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय

    बलिया : फेसबुक लाईव्ह’ करणं दोन तरुणांना महागात पडले असून यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा अंतर्गत बांसडीह कोतवाली विभागातील मरितार गावजवळ सुरहा डोहाजवळ ही घटना घडलीय.होडीतून प्रवास करतानाची मस्ती लाईव्ह करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलंय. लाईव्ह करताना अचानक होडी उलटली आणि दोन तरुणांना पोहता न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या होडीतून सहा तरुण प्रवास करत होते.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरितार गावातील रहिवासी असलेले सहा तरुण रविवारी दुपारी एक छोटी होडी घेऊन सुरहा डोहातील पाण्यात उतरले होते. होडी चालक नसल्यानं तरुण स्वत:च होडी चालवत होते. मौजमजा आणि मस्ती सुरू असतानाच त्यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केलं. या दरम्यान होडीवरचं त्यांचं नियंत्रण सुटलं आणि होडी पाण्यात उलटली.होडी उलटल्यानं सगळेच तरुण पाण्यात पडले. त्यांनी वाचवण्यासाठी जोरजोरात आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या काही मच्छीमारांनी आपला जीव धोक्यात टाकत या तरुणांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या आणि सहाही तरुणांना पाण्यातून बाहेर काढलं.

    परंतु, यातील दोन तरुणांची स्थिती गंभीर असल्यानं त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. इथे दोन्ही तरुणांना मृत घोषित करण्यात आलं. मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावं अनुज गुप्ता आणि दीपक गुप्ता अशी आहेत. तर इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. सेल्फी, सोशल मीडिया स्टेटस, लाईव्ह यांच्या नादात कुणी जीव गमावण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. नागरिकांनी आपले प्राण धोक्यात टाकून असे प्रकार करू नयेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय