fasttag discount

फास्टॅग(FasTag) बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं चोवीस तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत(Discount On Toll) मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं आहे.

    मुंबई: कुठल्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर चोवीस तासांमध्ये परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत (Discount) मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती (Technical Information) नसल्यामुळे अनेकदा गैरसमज होतात. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं चोवीस तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत(Discount On Toll) मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं आहे.

    आधी हायवेवरून प्रवास करताना एखाद्या टोलनाक्यावरून आपण चोवीस तासांच्या आत परत येणार असू, तर टोलच्या एकूण रकमेवर पंचवीस टक्के सवलत मिळत असे. टोल बंद झाल्यामुळे ही सवलत बंद झाली, असं अनेकांना वाटतं. मात्र उलट ही सवलत बंद झाली नसून आता पंचवीस टक्क्यांऐवजी पन्नास टक्के सवलत मिळते. प्रत्यक्षात जेव्हा वाहन टोलनाक्यावरून पास होतं, तेव्हा फास्टॅग खात्यातून रक्कम वजा होता. चोवीस तासांच्या आत पुन्हा त्याच टोलनाक्यावरून परतीच्य मार्गे आलं तरी पूर्ण रक्कम खात्यातून कापली जाते. मात्र काही तासांत सर्व्हरला याची सूचना जाते आणि सवलतीची रक्कम पुन्हा एकदा वाहनधारकाच्या खात्यात जमा होते.

    एखादं वाहन जेव्हा टोलनाक्यावर जातं, तेव्हा तिथं आकारल्या जाणाऱ्या टोलची पूर्ण रक्कम फास्टॅग खात्यातून कापली जाते. चोवीस तासांच्या आत जरी परत आलं, तरी फास्टॅगच्या यंत्रणेला याचा फिडबॅक नसल्याने पूर्ण रक्कमच कापली जाते. मात्र फास्टॅग सर्व्हरवर एक वाहन एका टोलनाक्यावरून जाऊन चोवीस तासांच्या आत परत आल्याची नोंद होते. त्यानंतर एका वेळच्या टोलच्या पन्नास टक्के टोलची रक्कम ही संबंधित खात्यावर वळती करण्यात येते.

    तुम्ही चोवीस तासांच्या आत एखाद्या टोलनाक्यावरून परत आलात आणि तरीही तुमच्या खात्यावर सवलीतीची रक्कम जमा होत नसेल, तर तुमच्या संबंधित बँकेला याची कल्पना द्या, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. कधीकधी सर्व्हरला प्रोसेसिंग करायला वेळ लागल्याने दहा ते बारा तासही यासाठी लागू शकतात. मात्र बहुतांश वेळा खात्यातून रक्कम कापली गेल्यानंतर दोन ते तीन तासांत ती पुन्हा खात्यात जमा होते.