जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या चार नेत्यांनी दिला राजीनामा

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाच्या चार नेत्यांनी राजीनामा दिला आहे. हे चारही जण  बडगाममधील आहेत . राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये बडगामचे सरचिटणीस आणि एमएम मोर्चा बडमगामचे सरचिटणीस यांचा समावेश आहे.  विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अनेक भाजपा नेत्यांनी राजीनामा दिले आहेत.  यात कुलगामच्या देवसर येथील भाजपाचे सरपंच, भाजपा नेते सबजार अहमद पाडर, निसार अहमद वानी आणि आशिक हुसैन पाला यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील वाढत्या  दहशतवादी हल्ल्यांमुळे हे  राजीनामा सत्र सुरू झाले असल्याची चर्चा आहे.  या अगोदर आज सकाळी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील भाजापाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हमीद नजार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नजार हे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

काश्मीर खोऱ्यात भाजपा कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.   ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील वेस्सु गावात सरपंच सजाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.जम्मू-काश्मीरचे भाजप अध्यक्ष रविंदर रैना यांनी या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमधुन पाकिस्तानचे वाढते नैराश्य समोर येत आहे.हे  भ्याड  हल्ले असून याला पक्ष घाबरणार नाहीअसं रैना यांनी सांगितलं आहे.