gate exam

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट-२०२२ परीक्षेची नोंदणी(GATE 2022 Registration) प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.

  नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट-२०२२ परीक्षेची नोंदणी(GATE 2022 Registration) प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. या परीक्षेची नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल.  गेट परीक्षेची नोंदणी २ सप्टेंबरपासून करता येईल. गेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटवर सगळी माहिती मिळेल. आयआयटी खरगपूर या संस्थेकडे गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आता २ सप्टेंबरपासून सुरू होईल. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेट २०२२ साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

  गेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख २ सप्टेंबर २०२१ आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.
  विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२१ आहे. अर्जामध्ये सुधारणेचे काम २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणार आहे. श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२२ आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार गेट परीक्षेच्या प्रस्तावित तारखा ५, ६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ या आहेत. तसेच १७ मार्च २०२२ ला निकाल जाहीर होऊ शकतो.

  गेट २०२२ नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE २०२२ च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल. विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

  आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते.