गहलोत-पायलट पुन्हा आमने-सामने! ; राजस्थान पंचायत निवडणुकीत काँग्रेसला झटका

जयपूर : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल काँग्रेससाठी एक झटका आहे. या निकालामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे राजकीय वजन कमी होण्याची शक्यता आहे. हे निकाल गेहलोत यांचे राजकीय स्पर्धक सचिन पायलट गटासाठी थोडे फायद्याचे ठरू शकतात.

जयपूर : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल काँग्रेससाठी एक झटका आहे. या निकालामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे राजकीय वजन कमी होण्याची शक्यता आहे. हे निकाल गेहलोत यांचे राजकीय स्पर्धक सचिन पायलट गटासाठी थोडे फायद्याचे ठरू शकतात. डिसेंबर किंवा पुढच्या महिन्यात राजस्थानातील महामंडळे आणि अन्य पदांवर नेमणुका होणार आहेत. त्यावेळी पायलट समर्थकांना महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची अपेक्षा आहे. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेससाठी हा एक झटका आहे. या निकालांमुळे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट पुन्हा आमने- सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.

नव्या नियुक्त्यांवर नजर
प्रदेश काँग्रेसच्या समित्यांवर तसेच राज्यातील अन्य पदांवर समान नियुक्त्या होतील असे राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी आधीच सांगितले आहे. सचिन पायलट गटाची या नियुक्त्यांवर नजर आहे. ज्यांनी पायलट यांच्याबरोबर जवळीक दाखवली त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नव्या नियुक्त्यांमध्ये विचार होईल अशी पायलट गटाला अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून जे कार्यकर्ते मेहनत करताहेत, त्यांना नियुक्त्त्यांमध्ये वाटा दिला पाहिजे असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

विस्तवही जात नाही
स्थानीक निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालामुळे काँग्रेसमध्ये चिंताही पसरली आहे. गहलोत-पायलट यांच्यात विस्तवही जात नसल्योन या पराभवाचा काय परिणाम होणार यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. पायलट समर्थक पराभवाच्या कारणांचा शस्त्राप्रमाणे वापर करण्याचीही शक्यता आहे तसेच गहलोत यांचा प्रभावही घटला असल्याचा प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.

गटबाजीच पराभवास कारणीभूत
दरम्यान, काँग्रेसच्या पराभवामागे गटबाजी हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर डुंगरपूर आंदोलन, गुर्जर आंदोलन काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठरले. काँग्रेस अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात विभागली गेल्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची निवड न करणे, तिकीट वाटपात घराणेशाहीला महत्त्व दिल्याचेही बोलले जाते.

राजस्थानात ज्याची सत्ता त्याचाच विजय निश्चित असतो अशी मान्यता आहे. यंदा मात्र उलट झाले आहे. आता मतदारांचे मतपरिवर्तन झाले असून मतदारांचा कल भाजपाकडे आहे. 2.5 कोटी मतदारांपैकी अधिकांश शेतकरी आहेत. कोट्यवधी शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान केले त्यावरूनच शेतकऱ्यांचा भाजपाला पाठिंबा आहे हे सिद्ध होते. शेतीत करण्यात आलेल्या सुधारणांमुळेच शेतकऱ्यांनी भाजपाला मतदान केले आहे. सरकारच्या चार मोठ्या मंत्र्यांचाही जिल्हा परिषदेत पराभव झाला आहे.

- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री