girl scolded by parents run away with friend police shahjahanpur
मैत्रीसाठी काहीही: एकीला पालक ओरडले तर दुसरीनेही तिच्यासोबत घरातून काढला पळ

मैत्री निभावण्यासाठी या दोन्ही मैत्रिणींनी आपल्या घरातून पळ काढला असून त्या बेपत्ता झाल्या होत्या. सध्या या दोघीही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

उत्तरप्रदेश : आजवर आपण मित्र मैत्रिणींच्या मैत्रीचे किस्से अनेक ऐकले असतील, पाहिलेही असतील पण शाहजहांपुर येथील दोन मैत्रिणींनी मैत्रीसाठी जे केलं, ते ऐकून तुम्ही हैराण-परेशान नाही झाला तर नवलंच. मैत्री निभावण्यासाठी या दोन्ही मैत्रिणींनी आपल्या घरातून पळ काढला असून त्या बेपत्ता झाल्या होत्या. सध्या या दोघीही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

असं आहे प्रकरण

सदर बाजार पोलिस ठाणे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्यात दाखल केली होती. एका मुलीला तिचे पालक ओरडल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिच्या सोबत घरातून पळ काढला. आई-बाबा रागवल्यानंतर दोस्ती निभावण्यासाठी या दोघींनी असं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसही हैराण झाले आहेत.

दोन तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच पोलिस महासंचालकांनी तात्काळ पोलिसांच्या दोन टीम तयार करून लवकरच या बेपत्ता तरुणींना शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने दोन्ही तरुणींचे ठिकाण शोधले ते प्रथम लखनऊ होते. त्यांना शोधण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पण त्या ठिकाणी मोबाइल बंद असल्याने त्यांचे नेमके लोकेशन सापडत नसल्याने त्यांना शोधणे अवघड जात होते अशी माहिती पोलीस महासंचालक एस आनंद यांनी दिली.

त्यानंतर त्यांचे लोकेशन उन्नाव येथे असल्याचे समोर आले. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले खरे पण नेमकं लोकेशन सापडत नसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि अखेर पोलिसांना दोन्ही तरुणींना बनारस येथे ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर या दोघींनाही पोलीस शाहजहांपूरकडे रवाना झाले आणि त्यानंतर त्यांनी या दोघींचीही चौकशी सुरू केली. २० नोव्हेंबरला या तरुणींनी घरातून पळ काढला. दोघी बेपत्ता असल्याची तक्रार २२ नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढणे सुरू केले. चौकशी दरम्यान त्यातल्या एका तरुणींने पालक ओरडल्याने आपण नाराज होऊन घरातून पळ काढला असल्याचे सांगितले सोबतच आपली मैत्रीणही होती. तथापि, या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.