दिलासादायक:  देशातील रिकव्हरी रेट पोहोचला ७७.७७ टक्क्यांवर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ८१ हजार ५३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशाचा रिकव्हरी रेट(india recovery rate) ७७.७७ वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ३६ लाख २४ हजार १९६ नागरिक कोरोनामुक्त(free from corona) झाले आहेत.

महत्वाची बाब म्हणजे  देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येतील ६० टक्के प्रमाण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व उत्तर प्रदेशमधील रुग्णांचे आहे. मात्र  देशात मागील २४ तासांमध्ये ९७ हजार ५७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १ हजार २०१ कोरोना रुग्ण दगावले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये ६९ टक्के मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व दिल्लीमधील आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला कारण ९७ हजार ५७० नव्या रूग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ झाली आहे. देशात सध्या अॅक्टिव्ह केसेस ९ लाख ५८ हजार ३१६  इतक्या आहेत. तसेच आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.