तळागळातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणे हीच गोपीनाथजींना श्रध्दांजली ;  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गरीब जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केला. संसदेच्या सभागृहातही त्यांनी सातत्याने गरीब, वंचित घटकांच्या विकासासाठी आवाज उठविला. गरीब जनतेला दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी विशेष योजना राबवली. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली हे कोणी नाकारू शकत नाही. तळागळात प्रत्यक्ष काम करून ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेते ठरले आहेत. याप्रसंगी, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही आपल्या भावना मांडल्या.

  मुंबई : राष्ट्रीय नेते असूनही तळागळातल्या सर्व घटकांशी नाळ जुळलेला लोकनायक म्हणून ओळख असलेला एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. ते केवळ एका समाजाचे नेते नसून तळागळातील सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करणारे लोकनेते होते. त्यामुळे देशातल्या वंचित, गरीब जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी कार्य करणे हीच गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी खरी श्रध्दांजली असेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले.

  संघर्षामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले
  नड्डा म्हणाले की, डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याची माहिती तरूणांसाठी प्रेरणादायी ठरेल. संघर्षमय जीवन व धाडस यांचे अलौकिक अशी गुंफण मुंडे यांच्या जीवनप्रवासात दिसून येते. आयुष्यभर त्यांनी समाजातील गरीब, वंचित, शेतकरी बांधवासाठी कार्य केले. गोपीनाथ मुंडे हा गरीब, वंचित लोकांचा बुलंद आवाज होता. त्यांच्याप्रती असलेली तळमळ ही प्रत्येकवेळी संसदेच्या सभागृहातील त्यांच्या भाषणामधून दिसून यायची. संसदेतला त्यांचा वावर, त्यांची भाषणशैली ही आकर्षक व प्रभावशाली होती. प्रत्येक वर्गातल्या व्यक्तींशी त्यांचे सौहार्दपूर्ण नाते होते. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे व सतत अन्यायाविरूध्दच्या संघर्षामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत.

  डाक विभागाकडून टपाल पाकिटाचे विमोचन
  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यातिथी निमित्ताने भारत सरकारच्या डाक विभागाकडून त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी दूरसंचार खात्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे, केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी, महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, खा. प्रीतम मुंडे व खा. डॉ. भागवत कराड यांच्यासह राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात ऑनलाईनच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

  देशाच्या राजकारणात भरून न येणारी पोकळी