‘मॅरीगोल्ड’ हिरेजडित अंगठीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद; असा झाला जागतिक विक्रम

हर्षित बन्सल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ही अंगठी तयार करणं हे आपलं स्वप्न होतं असंही तो म्हणतो. ही अंगठी सहजरित्या घालता येऊ शकते. सध्या ही अंगठी विकण्याचा कोणताही विचार नाही.

एका २५ वर्षीय व्यापाऱ्यानं तयार केलेल्या हिऱ्याच्या अंगठीची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या अंगठीची विशेष बाब म्हणजे या अंगठीत छोटे मोठे असे १२ हजार ६३८ हिरे लावण्यात आले आहेत. या अंगठीला त्या व्यापाऱ्यानं ‘मॅरीगोल्ड’ असं नावही दिलं आहे. याचं वजन केवळ १६५ ग्राम इतकं आहे. सध्या ही अंगठी विकण्याची इच्छा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हर्षित बन्सल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ही अंगठी तयार करणं हे आपलं स्वप्न होतं असंही तो म्हणतो. ही अंगठी सहजरित्या घालता येऊ शकते. “जेव्हा सुरतमध्ये ज्वेलरी डिझाईनचं शिक्षण घेत होतो त्यावेळी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी या अंगठीची कल्पना आपल्या डोक्यात आली,” असं हर्षितनं सांगितलं.

“मी या अंगठीत दहा हजारांपेक्षा अधिक हिरे लावण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. सध्या ही अंगठी विकण्याचा कोणताही विचार नाही. ही अंगठी तयार होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असंही तो म्हणाला. यापूर्वी हिऱ्यांची अंगठी तयार करण्याचा विक्रम एका भारतीयाच्याच नावावर होता. त्या अंगठीमध्ये तब्बल ७ हजार ८०१ हिरे होते.