ग्वाल्हेर, ओरछा शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा
ग्वाल्हेर, ओरछा शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा

युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे. युनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे.

मध्य प्रदेशातील ओरछा व ग्वाल्हेर या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की, ही दोन किल्ल्यांची शहरे आहेत त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे म्हणून आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.

युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे. युनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे. दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील.

यात शहर सौंदर्याबाबत काही सूचना केल्या जातील पण त्यात इतिहास हरवणार नाही याची काळजी घेतली जाईल. वारसा यादीत समावेश झाल्यानंतर मानसिंग प्रासाद, गुजरी महाल व सहस्र बाहू मंदिर यावर रासायनिक प्रक्रिया केली जाणार असून तसे केल्याने त्यातील कला जास्त प्रकर्षांने दिसून येणार आहे.

ओरछा

हे शहर मंदिरे व राजप्रासादांसाठी प्रसिद्ध आहे. १६ व्या शतकात बुंदेला राजांची ती राजधानी होती. तेथे राजमहाल, जहांगीर महाल, रामराजा महाल, राय प्रवीण महाल व लक्ष्मीनारायण मंदिर आहे.

ग्वाल्हेर

ग्वाल्हेरची स्थापना नवव्या शतकात झाली. तेथे गुर्जर प्रतिहार राजवंश, तोमर, बाघेल, कछवाहो, शिंदे घराण्यांचे राज्य होते. त्यांनी ठेवलेल्या स्मृतिखुणा आजही तेथील स्मारके, किल्ले व राजवाडे यात बघायला मिळतात.