‘त्याला’ लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा घेतला ; संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे.

    मुंबई : रामलीला आणि नवरात्रोत्सवात मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे.दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत या मोठया कारवाईची माहिती दिली. पोलिसांनी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फोटक व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.अटक केलेल्या दहाशतवाद्यांपैकी एकजण मुंबईच्या धारावी परिसरातील रहिवासी आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याला राजस्थानच्या कोटामधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता.

    मित्राला बसला धक्का
    जान मोहम्मद शेखचे मित्र असलेले फय्याज हुसैन यांनी सांगितले की, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला १२ सप्टेंबरला शेवटचं भेटलो होतो. आम्ही एकत्र चहाही प्यायलो, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो, जेव्हा आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा आम्हाला धक्का बसला, असे हुसैन यांनी सांगितले.फय्याज यांनी सांगितलं की,  त्यांना दिल्ली पोलिसांकडून फोन आला होता. दिल्ली पोलिसांनी जान मोहम्मदविषयी चौकशी केली आणि फय्याजबद्दलही पूर्ण माहिती घेतली. १३ तारखेला जान मोहम्मदने आपल्याला फोन केला होता, पण दोघेही बोलू शकले नव्हते, असंही फय्याज यांनी सांगितलं.जान मोहम्मदला पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांनाही सध्या मुंबई पोलिसांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

    दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता शेख
    जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.