कोंबड्यांच्या ट्रकला अपघात; कोंबड्या पळविण्यासाठी लोकांची झुंबड 

कोंबड्या लुटण्यासाठी काही जण बाईकवर स्वार होऊन आले होते. हाताला लागतील तितक्या कोंबड्या धरुन नागरिक पसार झाले.

भोपाळ. कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन पलटला या अपघातामुळे शेकडो कोंबड्या ट्रकच्या बाहेर आल्या. मध्यप्रदेशच्या बडवानी भागात घडलेल्या या अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि कोंबड्या पळविण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.

एकट्या वाहनचालकाचे गर्दीपुढे काहीच चालले नाही. कोंबड्या लुटण्यासाठी काही जण बाईकवर स्वार होऊन आले होते. हाताला लागतील तितक्या कोंबड्या धरुन नागरिक पसार झाले.

पिक अप चालकाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मालेगावहून कोंबड्या खिलचीपूरला नेल्या जात होत्या. सेंधवा कुशलगड राज्य महामार्गावर असताना दोंडवाडा गावाजवळ एक गाय ट्रकसमोर आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी ६०० ते ७०० मृत्युमुखी पडल्या, तर ३०० ते ४०० कोंबड्यांची लूट झाली.