हैदराबाद निवडणूक : राव, NTR यांच्या समाध्या पाडून दाखवा ; अकबरुद्दीन ओवेसींचे आव्हान

हैदराबाद : अतिक्रमणांच्या नावाखाली गरिबांची घरे पाडण्याऐवजी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन टी रामराव यांची समाधी उध्वस्थ करण्याचे धाडस दाखवा, असे आव्हान एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारला दिले आहे.बृहन हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या बैठकीत ओवेसी बोलत होते.

हैदराबाद : अतिक्रमणांच्या नावाखाली गरिबांची घरे पाडण्याऐवजी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन टी रामराव यांची समाधी उध्वस्थ करण्याचे धाडस दाखवा, असे आव्हान एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारला दिले आहे.बृहन हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या बैठकीत ओवेसी बोलत होते. हुसेनसागर तलावाच्या परिसरात अतिक्रमण केल्याच्या नावाखाली सरकार गरिबांच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून घेण्याच्या विचारात आहे. मात्र, स्वतः सरकारने धरणाच्या जागेत अतिक्रमण करून समाध्या उभारल्या आहेत. त्या समाध्या पाडण्याचे धैर्य सरकारने दाखवावे, असे ओवैसी म्हणाले.

-सरकारनेच केले अतिक्रमण
हुसेनसागर तलावाचे नियोजन करताना ४७०० एकर जागा धरणासाठी अधिग्रहित करण्यात आली. सध्या धरण ४ हजार एकर जागेवर उभे आहे. मग उरलेल्या ७०० एकर जागेचे झाले काय, असा सवाल ओवैसी यांनी केला. मक्ता मदार साहेब वसाहत बेकायदेशीर असल्याचा आरोप करणाऱ्या सरकारनेच या जागेवर अतिक्रमण करून ‘नेकलेस’ रस्ता आणि पी व्ही नरसिंह राव आणि एन टी रामाराव यांच्या समाध्या उभारल्या आहेत. अतिक्रमणे काढायचीच असतील तर गरिबांच्या डोक्यावरचे छप्पर उखडण्यापूर्वी या समाध्या पाडण्याचे काम सरकारने करावे, असे आव्हान ओवेसी यांनी दिले.

धर्मपुरी अरविंद

-भाजपा खासदाराची धमकी
भाजपाचे निजामाबाद येथील खासदार धर्मपुरी अरविंद यांनी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांना धमकी दिली. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास या दोन्ही भावांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. जीएचएमसी निवडणुकीत प्रचार करताना अकबरुद्दीन याद राखा, तेलंगणात भाजपाचे सरकार येऊ द्या, तु आणि तुझ्या भावाला माझ्या बुटाखाली ठेवेन. राज्यात आमची सत्ता येताच तू आणि तुझ्या भावाला आमच्या बुटाखालीच आयुष्य कंठावे लागेल असे ते म्हणाले.

तेजस्वी सूर्या

-खासदार तेजस्वी सूर्यांविरुद्ध गुन्हा
भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानिया विद्यापीठाचे कुलसचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये असलेल्या खासदार तेजस्वी सूर्या यांनीही उस्मानिया विद्यापीठाला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर विद्यापीठ प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. हैदराबाद विद्यापाठात येण्यापूर्वी तेजस्वी सूर्या यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सूर्या यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणाच्या पोलीस महानिरीक्षकांनी याची माहिती दिली.

-भाजपाचा एकमेव मुस्लीम उमेदवार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांनी हैदराबादेत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइकची घोषणा केली असली तरी पक्षाने एकमेव मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. मिर्झा अखिल अफंदी असे या उमेदवाराचे नाव असून दाबिरपुरा वॉर्डातून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. माझ्या आई-वडिलांचे भाजप आणि शिवसेनेसोबत जुने संबंध आहेत, असे मिर्झा अखिल यांनी सांगितले. अखिल हे युवा उद्योजक आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. यावर्षी त्यांनी पोटनिवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आणि टीआरएसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर फेकले होते. या वॉर्डात फक्त २५ टक्क्यांपेक्षाही कमी मतदान पार पडले होते. यापैकी त्यांनी दोन हजार मते मिळवली. एमआयएमच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा अखिल यांनी केला.

-एनआरसी मुस्लिमांविरोधात नाही
आम्ही संपूर्ण शहरात प्रचार करत असून भाजप सर्वसामान्य मुस्लिमांच्या विरोधात नाही हे सांगत आहोत. खरे तर, एनआरसी मुस्लिमांच्या विरोधात नाहीच, असेही आम्ही पटवून देत आहोत, असं ते म्हणाले. अखिल घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.