thane market crowd

कोरोना नियमांचे(Corona Rules) पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने(Home Ministry Order To State Government) राज्यांना दिल्या आहेत.

  कोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला (Crowd)सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा(Corona Third Wave) दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने(Home Ministry Order To State Government) राज्यांना दिल्या आहेत.

  केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव व प्रशासक यांना लिहिलेल्या पत्रात भल्ला म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व अन्य स्थानिक अधिकाऱ्यांना कठोर मार्गदर्शक सूचना द्याव्यात आणि कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

  “कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्बंध हटविणे सुरू केले आहे. परंतु हे निर्बंध काळजीपूर्वक दूर केले पाहिजेत. देशाच्या विविध भागात विशेषतः सार्वजनिक वाहतूक आणि डोंगराळ भागात कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली आहे, लोक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत नाहीत, यामुळे काही राज्यात पुन्हा करोनाची प्रकरणे वाढली आहेत, ही चिंतेची बाब आहे”, असे केंद्राने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

  अजय भल्ला म्हणाले, “आपल्या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर रिप्रोडक्शन नंबर १.० पेक्षा जास्त असेल तर ते करोनाच्या प्रसाराचे संकेत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. करोना नियंत्रित करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, दुकाने, मॉल्स, मार्केट्स, रेस्टॉरंट्स आणि बार, मंड्या, रेल्वे स्थानक, जिम इत्यादींमध्ये कठोर नियम लागू केले जाणे आवश्यक आहे. कारण हे ठिकाणं करोना विषाणूचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात.”

  आतापर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपली नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वांचे लसीकरण होत नाही. तोपर्यंत सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच कोरोना टेस्टिंग वेगात सुरु ठेवावी, असे भल्ला म्हणाले.

  भल्ला म्हणाले की, “कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला पाच पट वेगाने टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण अशा स्वरुपात काम करावे लागेल. सर्व अधिकाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोनाबाबत कठोर मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात. तसेच कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे. कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा आपल्याला पुन्हा संकटात आणू शकतो.”