शुभेंदू भाजपात आले तर ममता सरकार मुदतीपूर्वीच पडणार  ; भाजपा नेत्याचा दावा

दिल्ली :  पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाचे उपाध्यक्ष आणि बैरकपूरचे खासदार अर्जुनसिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहे.

दिल्ली :  पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाचे उपाध्यक्ष आणि बैरकपूरचे खासदार अर्जुनसिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहे. खासदार अर्जुनसिंह यांनी, टीएमसी नेते शुभेंदु अधिकारी जर भाजपात आले तर ममता बॅनर्जीचे सरकार निवडणुकीपूर्वीच पडेल, असे सूतोवाच केले आहे. विशेष म्हणजे अर्जुनसिंह यांनी यापूर्वी, टीएमसीचे ५ खासदार कोणत्याही क्षणी भाजपात सहभागी होऊ शकतात, असा दावा केला होता.

मंत्रिपदाचा दिला होता राजीनामा
बंगालमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सुभेंदु अधिकारी ममता सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. आता ते लवकरच भाजपात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, टीएमसी नेत्यांना शुभेंदु पक्ष सोडून जाणार नाही, असा विश्वास आहे.

भाजप खासदार अर्जुनसिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शुभंदु अधिकारी भाजपात सहभागी होणार असल्याची चर्चांना बळ मिळाले आहे. शुभेंदु अधिकारी जर भाजपात सहभागी होणार असेल तर बंगालचे सरकार निवडणुकीपूर्वीच कोसळेल. अधिकारींच्या पक्षबदलामुळे अनेक नेते सरकारमधून बाहेर पडतील, असा दावा अर्जुनसिंग यांनी केला आहे.

आणखी एक मंत्री बंडखोरीच्या पावित्र्यात
भाजपने तृणमूलच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी आता नेते तोडफोडीचे राजकारण सुरू केले आहे. शुभेंदु अधिकारी यांच्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याने बंडखोरीचा सूर आळवला आहे. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या, डोमजूडचे आमदार राजीव बॅनर्जी सध्या पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. पक्षात योग्य नेत्यांना नव्हे तर भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ दिले जात आहे. येणाऱ्या काळात जनता याचा न्याय करेल, असे सांगत बॅनर्जी यांनी पक्षावरील आपली नाराजी जाहीर केली आहे. वनमंत्री यामुळे राजीव बॅनर्जी बंडकोरीच्या पावित्र्यात असल्याची चर्चा बंगालच्या राजकारणात सुरू झाली आहे.