कोरोनाकडे केलेलं दुर्लक्ष भारी पडणार : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत झालीये घट : दोन सर्वेक्षण अहवालातून बाब स्पष्ट

मोदी समर्थकांमध्ये घट होऊ लागली आहे असं अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने म्हटलं आहे. ही कंपनी जागतिक नेत्यांसंदर्भात घडामोडींचा अभ्यास करत असते. भारताच्या सी व्होटर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली आहे. मोदींच्या कामगिरीवर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांमध्ये घट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

  नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शक्तिशाली नेता या प्रतिमेवर झाला आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यात आलेल्या अपयशाने मोदी यांच्या ताकदवान नेता या गुणांकनात घट झाली असल्याचं दोन सर्वेक्षणांतून स्पष्ट झालं असल्याचं वृत्त बीबीसी मराठीने दिलं आहे.

  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार २०१४ मध्ये दणदणीत बहुमतासह सत्तेत आलं. २०१९ मध्येही मोदींच्या करिष्म्याने जादू केली आणि त्यांचंच सरकार पुन्हा निवडून आलं. या दोन विजयांमुळे देशातील सगळ्यांत मोठे नेते अशी मोदींची प्रतिमा तयार झाली.

  मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने २५ दशलक्षचा आकडा ओलांडला आहे. या लाटेला सामोरं जाण्यासाठी मोदी सरकारने पुरेशी तयारी केली नव्हती हे स्पष्ट झालं.

  यामुळे मोदी समर्थकांमध्ये घट होऊ लागली आहे असं अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने म्हटलं आहे. ही कंपनी जागतिक नेत्यांसंदर्भात घडामोडींचा अभ्यास करत असते.

  मोदींचं गुणांकन या आठवड्यात ६३ टक्के एवढं आहे. ऑगस्ट २०१९ पासून अमेरिकेची ही कंपनी मोदींच्या लोकप्रियतेचा, त्यांच्या पाठीराख्यांचा अभ्यास करते आहे. एप्रिल महिन्यात मोदींच्या गुणांकनात २२ गुणांची एवढी मोठी घट झाली.

  भारताच्या सी व्होटर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातही हीच बाब उघड झाली आहे. मोदींच्या कामगिरीवर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांमध्ये घट झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

  गेल्या वर्षी मोदींच्या प्रदर्शनावर अतिशय समाधानी असलेल्या नागरिकांची संख्या ६५ टक्के होती. ती आता ३७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

  मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच, सात वर्षात मोदी सरकारप्रती नाराजी असणाऱ्यांची संख्या मोदी सरकारची भलामण करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.

  पंतप्रधानांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असं सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

  कोरोनाचा संसर्ग शहरांच्या बरोबरीने ग्रामीण भागात पसरू लागला आहे तसतसं पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत घट होऊ लागली आहे. शहरांमध्ये नागरिकांना ऑक्सिजन, बेड्स, औषधं यांच्यासाठी वणवण करावी लागते आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पार्थिवांची रांग लागल्याचं चित्र आहे. सरकारची साथ नसल्याने असहाय्य नागरिक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

  दिल्ली आणि मुंबई या मोठ्या शहरांना कोरोनाने घातलेला विळखा हळूहळू सैल होऊ लागला आहे. मात्र आता हा व्हायरस ग्रामीण भागात वेगाने पसरतो आहे. या भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही.

  देशातल्या लोकांना हे उमगून चुकलं आहे की त्यांना त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांचीच साथ आहे. सरकार मदतीला येणार नाही असं काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

  कोविडविरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने बाजूला राहिलं आहे असं ते म्हणाले. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मोदी सरकारने म्हटलं आहे. शतकात एकदाच येणारी अशी ही संसर्गाची साथ आहे असं मोदी सरकारने म्हटलं आहे.

  कोरोनाला रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या मुद्यावर सरकारला घेरता न आल्याने मोदींच्या गुणांकनात घट झाली असली तरी तेच अजूनही देशातील सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत असं सी व्होटर सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

  २०२४ पर्यंत पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय निवडणुकांना सामोरं जायचं नाहीये.

  मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे का?

  ब्रिटनच्या संडे टाईम्स वृत्तपत्रात नुकतीच एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीचा मथळा होता, “मोदींनी भारताला लॉकडाऊन आणि कोविड संकटाच्या खाईत लोटलं.”

  ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्राने हीच बातमी पुनःप्रकाशित केली. या बातमीचा सारांश होता, “अहंकार, अति-राष्ट्रवाद आणि प्रशासनाची अकार्यक्षमता यांच्यामुळे भारताचं संकट अधिक मोठं झालं. लोकप्रिय पंतप्रधानांचा आधार असलेल्या लोकांचा श्वास गुदमरला जात आहे.” ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासाने या लेखावर आक्षेप नोंदवला आहे.

  भविष्यात अशाप्रकारे निराधार बातम्या प्रकाशित करू नये, असं दूतावासानं म्हटलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला भारतातील कोविड संकटाने मोठा दणका दिला, हे वास्तव आहे. जगभरातील माध्यम आणि समाजमाध्यमांमध्ये भारतातील दुसऱ्या कोविड लाटेची जोरदार चर्चा आहे.

  बेड, ऑक्सिजन आणि उपचारांअभावी रुग्ण जीवाच्या आकांताने तळमळत आहेत. तर त्यांचे नातेवाईक या गोष्टींची सोय करण्यासाठी आकाश-पाताळ एक करत फिरताना दिसत आहेत.

  मृतांवर सामूहिक अंत्यविधी केले जात आहेत. इतकंच नव्हे तर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा न उरल्याने पार्किंग म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोकळ्या जागांचा वापर मृतदेह जाळण्यासाठी केला जात आहे.

  मोदी यांनी स्वतःची प्रतिमा जगभरात सक्षम प्रशासक म्हणून पुढे आणली होती. पण सध्या भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असून या संकटासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरलं जात आहे.

  प्रतिमेला धक्का

  राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मिलन वैष्णव सांगतात, “आता अनेक जण मोदींच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. संकटादरम्यान सरकार कमी पडलं, इतकंच नव्हे तर परिस्थिती आणखी बिकट करण्यात त्यांनी हातभार लावला.” अशा परिस्थितीत अडकलेले नरेंद्र मोदी हे काही एकमेव नेते नाहीत. पण त्यांचं अपयश स्पष्टपणे दिसून येतं, ही वस्तुस्थिती आहे.

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याप्रमाणे त्यांनी कोरोना संकटाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं नव्हतं. पण तरीही आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती टाळण्यात त्यांना अपयश आलं.

  Ignoring Corona will weigh heavily PM Narendra Modis popularity plummets saysTwo survey reports