रामदेव बाबांना ‘ते’ वक्तव्य करणं भोवलं ?  आयएमएने केली कारवाईची मागणी

योगगुरु रामदेव (Yoguru Ramdev)यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    सध्या योगगुरु रामदेव(Ramdev baba) विरुद्ध आयएमए(IMA) सामना पाहायला मिळत आहे. योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    आयएमएने एक पत्रक जारी केलं आहे. “एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा”, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.

    ‘देश कोरोनाची लढाई लढत आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने उपचार सुरु आहेत. भारत सरकारही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत आतापर्यंत १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी जीव गमवला आहे. असं असताना योगगुरु रामदेव आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि बिनकामाचं विज्ञान आहे, असं सांगताहेत’, याकडेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.

    योगगुरु रामदेव यांनी कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.