Corona

दररोज आढळणार्‍या नवीन कोरोना रुग्णांच्या(corona patients) संख्येने देशात आज नीचांकी पातळी गाठली आहे. महत्वाची बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्तीचा दर(corona recovery rate) हा ९६.६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

नवी दिल्ली : दररोज आढळणार्‍या नवीन कोरोना रुग्णांच्या(corona patients) संख्येने देशात आज नीचांकी पातळी गाठली आहे. सात महिन्यांनंतर पहिल्यांदा एकूण राष्ट्रीय संख्येमध्ये फक्त १०,०६४ नव्या रुग्णांची भर पडली. याआधी १२ जून, २०२० रोजी १०,९५६ नवे रुग्ण आढळले होते. महत्वाची बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्णमुक्तीचा दर हा ९६.६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

भारताच्या सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या केवळ १.९० टक्के आहे. चाचणीच्या पायाभूत सुविधांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रुग्णवाढीच्या दरामध्येही मोठी घसरण दिसून आली. भारताचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.९७ टक्के आहे.

२२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. १३ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. अंदाजे आठ महिन्यांनंतर देशात गेल्या २४ तासांत १४० पेक्षा कमी म्हणजे १३७ मृत्यूंची नोंद झाली. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आज ९६.६६ टक्क्यांवर गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ कोटी, ०२ लाख, २८ हजार, ७५३, वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख, ०८ हजार, ०१२ इतकी आहे. गेल्या २४ तासांत देशात १७,४११ रुग्ण बरे झाले. नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी ८०.४१ टक्के रुग्ण दहा राज्ये /केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये मंगळवारी एकाच दिवसात सर्वाधिक ३,९२१ रुग्ण बरे झाले.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३,८५४ रुग्ण बरे झाले, तर छत्तीसगढमध्ये १,३०१ रुग्ण बरे झाले. गेल्या २४ तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ७२.९९ टक्के मृत्यूंची नोंद आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे.