भारताचे पाकिस्तान करण्याचे षडयंत्र होते! सरसंघचालकांचे वादग्रस्त विधान

  गुवाहाटी : दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आलेले सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लीम आणि पाकिस्तान मुद्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. भारतामध्ये 1930 मध्ये योजनापूर्वक मुस्लीमांची लोकसंख्या वाढली होती, असे सांगत भारतात बंगाल, आसाम व सिंधलाही पाकिस्तान बनविण्याचे कारस्थान होते, असा दावाही त्यांनी केला. परंतु ही योजना यशस्वी ठरली नाही आणि फाळणी होत केवळ पाकिस्तान तयार झाला, असे ते म्हणाले.

  सीएएमुळे मुस्लिमांचे नुकसान नाही

  सीएए एनआरसीमुळे भारतातील मुस्लिमांचे काही नुकसान होणार नाही असे भागवत म्हणाले. संविधानात आम्ही आम्ही देशातील अल्पसंख्यांकांची काळजी घेऊ असे म्हटले आहे. आम्ही हे केले पण पाकिस्तानने केले नाही, अशी टीकाही त्यांनी पाकिस्तानवर केली. देशाच्या फाळणीवेळी नेत्यांनी घेतलेला निर्णय जनेतने मान्य केला होता. त्यामुळे ज्यांना आता कोणी विचारत नाही त्यांची काळजी कोण घेणार? यात त्यांचा काय दोष आहे असा प्रश्नही भागवत यांनी विचारला.

  राजकीय फायद्यासाठीच फुटीचा प्रयत्न

  यापूर्वी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य भागवत यांनी केले होते. त्यानंतर आता नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवर भाष्य करताना यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला त्रास होणार नाही. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याशी काही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी याला धार्मिक रंग दिला जात आहे.

  जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, सामाजिकता आणि लोकशाही शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरेत आणि रक्तात ते आधीपासूनच आहे. आमच्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आहे आणि अजुनही देशात हे अस्तित्वात आहे.

  - मोहन भागवत, सरसंघचालक