कोरोनामुळे विमान क्षेत्राला इतक्या कोटींचा फटका, इक्रा अहवालात मांडण्यात आला अंदाज

इक्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२१ या आर्थिक वर्षात भारतीय विमान क्षेत्राला(Indian aviation Industry will loose 21 thousand crore) जवळपास २१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार आहे.

कोरोनाचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसला आहे. त्यातही सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसला आहे. क्रेडिट रेटिंग संस्था इक्रा लिमिटेडच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार २०२१ या आर्थिक वर्षात भारतीय विमान क्षेत्राला(Indian aviation Industry will loose 21 thousand crore) जवळपास २१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार आहे.

विमान कंपन्यांना आपल्या तोट्यातून तसेच कर्जातून बाहेर येण्यासाठी २०२१ या आर्थिक वर्षापासून २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत ३७ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे २३ मार्चनंतर देशांतर्गत सेवांसोबतच आंतरराष्ट्रीय सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र आता परिस्थिती थोडी सुधारताना दिसत आहे.

आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत विमान उद्योग क्षेत्रावरील कर्ज वाढून ५० हजार कोटी रूपयांच्या घरात जाण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. इंडिगो आणि स्पाईसजेट लिमिटेड यांना आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान दररोज ३१ कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. आता ते दररोज २६ कोटी रूपयांपर्यंत आलं असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत लसीची उपलब्धता नसण्याची चिन्हे यामुळे प्रवासी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता इक्राने व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर हळूहळू प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असेही अहवालात सांगण्यात आले आहे.