tax

बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इतर कंपन्यांनी केलेल्या करचुकवेगिरीतून भारत दरवर्षी सुमारे ७५,००० कोटी रुपये गमावत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल स्टेट ऑफ टॅक्स जस्टीसने जाहीर केला आहे.

दिल्ली: कराचे संकलन(tax collection) वाढण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपयाययोजना करण्यात येतात. असे असले तरी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इतर कंपन्यांनी केलेल्या करचुकवेगिरीतून भारत दरवर्षी सुमारे ७५,००० कोटी रुपये गमावत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल स्टेट ऑफ टॅक्स जस्टीसने जाहीर केला आहे.

खासगी कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेटकडून होणाऱ्या करचुकवेगिरीतून जगभरातील देश दरवर्षी ४२७ अब्ज डॉलर गमावितात. ही रक्कम म्हणजे ३४ दशलक्ष परिचारिकांच्या वार्षिक वेतनाएवढी आहे. भारतात दरवर्षी १०.३ अब्ज डॉलर करचुकवेगिरीतून बुडविले जातात. त्यामध्ये १०.३ अब्ज डॉलरहून अधिक रकमेची करचुकवेगिरी ही बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून केली जाते. कर चुकवेगिरीचे प्रमाण हे अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राकरिता करण्यात आलेल्या तरतुदीच्या ४४.७० टक्के आहे तर शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात येणाऱ्या १०.६८ टक्के निधीएवढे आहे.

या ठिकाणाहून आर्थिक प्रक्रियेत अनियमितता

मॉरिश, सिंगापूर आणि नेदरलँडमध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांकडून निधी वळता केला जातो. त्यामधून मोठ्या प्रमाणात अनुचित आर्थिक प्रक्रिया केली जाते असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. द स्टेट ऑफ टॅक्स जस्टीस अहवाल हा टॅक्स जस्टीस नेटवर्कने प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी फेडरेशन पब्लिक सर्व्हिसेस इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटना आणि ग्लोबल अलायन्सने सहकार्य केले आहे.

केंद्र सरकारच्या तिजोरीला फटका

कोरोना महामारीचा केंद्र सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत केंद्र सरकारच्या एकूण कर संकलनात तसेच आगाऊ (अॅडव्हान्स) कराच्या संकलानात २२.५ टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. यामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत २ लाख ५३ हजार ५३२ कोटी रुपयांचे एकूण करसंकलन झाले आहे.

भारताच्या दृष्टिकोनातून १०.३ अब्ज डॉलर्सपैकी सुमारे १०.११ अब्ज डॉलर्स आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट टॅक्स म्हणून गमावला जात आहेत. उर्वरित २०२.१५ मिलियन ही प्रायव्हेट टॅक्स चुकविणे आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या तिमाहीत भारत व परदेशात जाणाऱ्या पैशांची रक्कम घसरून ५.७अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही रक्कम ११.३ अब्ज डॉलर्स होती.

या अहवालात असेही म्हटले आहे की, जागतिक करातील ९८ टक्के इतके नुकसान हे तेच देश आहेत जिथे लोक जास्त पैसे कमवतात. उर्वरित २ टक्के कमी उत्पन्न देणारे देश समाविष्ट करतात. टीजेएनने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, या देशांच्या सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जास्त प्रॉफिट टॅक्स आकारला पाहिजे. यामध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे जे जागतिक स्तरावर डिजिटल सर्व्हिस प्रदान करतात आणि कोरोना युगातील सर्वाधिक उत्पन्न मिळवितात. या अहवालात परदेशातील मालमत्तांवर वेल्थ टॅक्स लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे.