latest inflation rate

कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मागणी आणि वितरणाच्या साखळीवर पडू शकते. कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना पुढील काही दिवस मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

 नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिल्ली. गेल्या आठवडाभरात खाद्यतेलासह डाळ, आलू, कांदे, टमाटे, गुळ व मिठाच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तांदूळ, गहू आणि पीठाच्या किंमतीही भडकल्या आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेरीनुसार 3 जानेवारी 2021 च्या तुलनेत 10 जानेवारी 2021 रोजी पाकिटबंद पामतेल 105 रुपयांवरून 111 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. सूर्यफूल तेल 135 वरून 138 आणि मोहरीचे तेल 137 वरून 143 रुपये प्रतिलिटरवर पोहचले आहे. वनस्पती तेलाच्या किंमतीत 4.5 टक्क्यांची वाढ झाली असून ते 107 रुपयांवरून 112 रुपये प्रतीलिटर दराने विकले जात आहे.

गुळ पन्नाशीच्या उंबरठ्यावर

गेल्या काही दिवसांपूर्वी 100 रुपयांपर्यंत पोहोचलेल्या कांद्याचे दर त्यानंतर काहीसे गडगडले होते. मात्र, 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2021 या आठवड्यात कांद्याच्या दरातही 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. 3 जानेवारी रोजी कांद्याचे सरासरी मूल्य 31.40 रुपये किलो होते, तर आता कांद्याचे दर 38.82 रुपये किलोवर पोहचले आहे. याच कालावधीत टमाटरच्या दरातही जवळपास 4 टक्के आणि आलूच्या दरात जवळपास 23.72 टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नाही, तर मीठाच्या दरानेही मोठी झेप घेतली आहे. मीठाच्या दरात 3 ते 10 जानेवारी दरम्यान 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचबरोबर, गुळाची मागणी वाढल्यामुळे त्याच्या दरातही तेजी आली आहे. गेल्या आठवडाभरात गुळ 43 रुपयांवरून वधारून 48.55 रुपये किलोवर पोहचले आहे.

डाळीच्या किंमतीतही वाढ

डाळींबाबत बोलायचे झाल्यास, मंत्रालयाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अरहर म्हणझेच तुर डाळीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तुरीची डाळ 104 रुपये किलो वरून 105 रुपयांच्या आसपास पोहचली आहे. उडदाची डाळ 106 वरून 109, मसुरची डाळ 78 वरून 82 रुपयांवर पोहचली आहे. खराब हवामान आणि शीतलहरीचा शेती उत्पादनाला जोरदार फटका बसला आहे. यामुळे महागाईचा भडका उडाल्याचे सांगितले जात आहे.बॉक्स

… तर पेट्रोल, डिझेलसह भाज्यांचेही दर वाढणार

कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मागणी आणि वितरणाच्या साखळीवर पडू शकते. कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांना पुढील काही दिवस मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतात महागाई वाढू शकते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वितरणात मोठा फटका बसू शकतो. सौदीच्या या निर्णयामुळे फेब्रुवारीपासून तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. तेलाचे दर वाढल्यानंतर साहजिकच त्याचा फटका परिवहन क्षेत्राला बसेल. परिवहनाचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम इतर उत्पादनांवर पडेल. वाढलेला परिवहन खर्च भरून काढण्यासाठी उत्पादक आपल्या उत्पादनाचा किंमती वाढवतील आणि त्यातूनच महागाईचा पुन्हा भडका उडेल. सध्या कांदा आणि टोमॅटोचे दर सोडले तर इतर सर्व भाज्यांचे दर सध्या स्थिर आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास त्याचा भाज्यांच्या किंमतीवरही थेट परिणाम पडू शकतो.

———