कोरोनामुळे कामाचे वांधे, खाद्यतेलामुळे खायचे वांधे

गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या महागाईनं कळस गाठलाय. गेल्या वर्षभरात १५ किलोच्या खाद्यतेलाच्या डब्याचे भाव ८०० ते १००० रुपयांनी वाढले आहेत. पाहता पाहता खाद्यतेलाच्या किंमती इतक्या वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत चढउतार सुरू असताना खाद्यतेलाच्या किंमती मात्र कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आर्थिक उत्पन्न घटलेल्या सामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर ताण येत असल्याचं चित्र आहे. 

    कोरोना संकटामुळे अगोदरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक व्यवसाय बुडाले. यातून सावरत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुन्हा धास्तावू लागले आहेत. त्यातच आता विविध पदार्थांच्या महागाईने डोकं वर काढलंय. त्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे खाद्यतेल.

    गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या महागाईनं कळस गाठलाय. गेल्या वर्षभरात १५ किलोच्या खाद्यतेलाच्या डब्याचे भाव ८०० ते १००० रुपयांनी वाढले आहेत. पाहता पाहता खाद्यतेलाच्या किंमती इतक्या वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे. भाजीपाल्याच्या किंमतीत चढउतार सुरू असताना खाद्यतेलाच्या किंमती मात्र कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आर्थिक उत्पन्न घटलेल्या सामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर ताण येत असल्याचं चित्र आहे.

    कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केल्यानंतर परदेशातून होणारी तेलाची आयात बंद झाली होती. कोरोना निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय वाहतूकच ठप्प असल्यामुळे अनेक महिने बाहेरच्या देशातून भारतात खाद्यतेल येत नव्हतं. त्यानंतर केंद्र सरकारनं तेलावरचं आयातशुल्क जास्त असल्यामुळे आयात तेलाचे दर चढेच राहिले. ज्या देशातून भारतात तेलबिया आयात करण्यात येतात, त्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे तेलबियांचं उत्पादन घटलं.

    देशांतील तेल उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलंय. मात्र त्यामुळे तेल उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी सर्वसामान्यांना तेलासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकारने आय़ात शुल्क कमी केले, तर परदेशातील तेल मागवणं व्यापारी पसंत करतील आणि तेलाचे दर आपोआप कमी होतील, असं सांगितलं जातंय.