गणेशमूर्तींची चीनमधून आयात करण्याची खरंच गरज आहे का ? : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवी दिल्ली – उद्योगांसाठी देशात उपलब्ध नसलेला कच्चा माल इतर देशांतून आयात करणे योग्यच आहे. त्यात चूक काहीही नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. मात्र गणेशमूर्तींच्या

नवी दिल्ली – उद्योगांसाठी देशात उपलब्ध नसलेला कच्चा माल इतर देशांतून आयात करणे योग्यच आहे. त्यात चूक काहीही नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. मात्र गणेशमूर्तींच्या आयातीबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर स्थानिक मूर्तीकारांकडून पारंपरिकरित्या गणेश मूर्ती खरेदी केल्या जातात. मात्र आता याच मूर्ती चीनमधून आयात करण्यात येत आहेत. आपण स्थानिक पातळीवर या मूर्ती घडवू शकत नाही का, ही स्थिती का निर्माण झाली. गणेशमूर्तींची चीनमधून आयात करण्याची खरंच गरज आहे का?, असा प्रश्न निर्मला सीतारमण यांनी संपूर्ण देशवासियांसमोर उपस्थित केला आहे. 

तामिळनाडूतील भाजपा कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. आर्थिक वाढीसाठी आणि व्यापारासाठी जगभरातून आयात करणे हे चूक नाही. तसेच ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनांना मदत होईल आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, अशा वस्तू आयात करण्यात काहीही चुकीचे नसल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. मात्र ज्या वस्तूंच्या आयातीने रोजगार मंदावतो किंवा आर्थिक वाढ खुंटते, अशा वस्तूंच्या आयातीने देशाची अर्थव्यवस्थाही खुंटते याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.   

आत्मनिर्भर भारत म्हणजेच स्वावलंबी भारत या अभियानाचा मुख्य उद्देशच ज्या वस्तू देशात उत्पादित होऊ शकतात, त्यांची आयात न करणे असा आहे. आयात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन हे भारतातील लघू आणि मध्यम उद्योगही करत आहेत. अशा परिस्थितीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंना देशवासियांनी स्वीकारायला हवे आणि उद्योगांना प्रोत्साहित करायला हवे. असे मत निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे.