आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत : जे.पी. नड्डा

सरकारकडून CAA च्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच CAA कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आम्ही CAAच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी स्पष्ट केले.

 नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. मात्र, आता सर्वच ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे आता सरकारकडून CAA च्या नियमांची आखणी केली जाईल. यानंतर लवकरच CAA कायद्याची अंमलबजावणी होईल आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आम्ही CAAच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी स्पष्ट केले.

जे.पी. नड्डा यांनी काल सोमवारी उत्तर बंगालमधील संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सिलिगुडी येथील बैठकीत भाजपच्या खासदार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी काही स्थानिक सामाजिक आणि धार्मिक समूहांची भेटही घेतली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘फोडा आणि राज्य करा’, या धोरणाचा अवलंब करत आहेत. तसेच ममता यांच्या हट्टामुळे पश्चिम बंगालमधील नागरिक मोदी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांपासूनही वंचित राहिल्याची आरोप नड्डा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने चालतात. त्यामुळे प्रत्येकाला विकासाची संधी मिळते. याउलट ममता बॅनर्जी या दुहीचे राजकारण करतात. आता विधानसभा निवडणूक आल्यावर ममता बॅनर्जी काहीतरी आमिष दाखवून सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतील, असेही नड्डा यांनी सांगितले.