ज्योतिषाने निवृत्त न्यायमूर्तींना लावला ८ कोटींचा चुना; प्रकरण जाणून थक्कच व्हाल

चांगले पद मिळवून देतो असे सांगत त्याने आपल्याला चुना लावल्याचे निवृत्त न्यायमूर्तींनी तक्रारीत सांगितले आहे. यावेळी त्यांना 26 लाखांची रोकड आणि ९१ कोटी रुपयांचे युवराजच्या नावाने असलेले चेक सापडले. तपासादरम्यान युवराजविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांना कळालं.

दिल्ली. आपल्या असंख्य प्रभावशाली व्यक्तींशी ओळख असल्याचे सांगत एका ज्योतिषाने निवृत्त न्यायमूर्तींना ८ कोटींचा गंडा घातला आहे. बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर या ज्योतिष्याला अटक केली आहे. चांगले पद मिळवून देतो असे सांगत त्याने आपल्याला चुना लावल्याचे निवृत्त न्यायमूर्तींनी तक्रारीत सांगितले आहे. युवराज रामदास (वय वर्ष ५२) असे या ज्योतिषाचे नाव आहे.

माजी न्यायमूर्ती बी.एस.इंद्रकला (वय वर्ष ६८) यांनी बंगळुरू पोलिसांकडे युवराजविरोधात तक्रार नोंदवली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता. इंद्रकला यांना युवराजने त्याच्या ओळखीचा वापर करत सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या पदाची नोकरी लावून देतो असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन देत त्याने जून २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या काळामध्ये त्यांच्याकडून ८.२७ कोटी रुपये उकळले होते.

विश्वास संपादन करून ओढले जाळ्यात

इंद्रकला यांच्याशी युवराज याची ओळख एका निवृत्त पोलीस अधीक्षकाने घडवून आणली होती. २०१७-२०१८ साली त्यांची ही भेट झाली होती. युवराजने इंद्रकला यांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी खोटं-खोटं भविष्य सांगायला सुरुवात केली. त्याने इंद्रकला यांना सांगितले होते की, त्यांचा जन्म हा फार मोठ्या पदावर काम करण्यासाठी झाला आहे. युवराजने इंद्रकला यांना त्याचे बड्या व्यक्तींसोबतचे स्वत:चे फोटो दाखवून प्रभावित केले.

आपले अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याची युवराजने इंद्रकला यांच्यापुढे थाप ठोकली होती. इंद्रकला यांचा आपल्यावर विश्वास बसलाय हे कळाल्यानंतर युवराजने आणखी एक बंडल फेकली. त्याने सांगितले की, केंद्रातील नेते इंद्रकला यांच्यासारख्या महिलेचा एका बड्या पदासाठी शोध घेत आहेत, मात्र या पदावर जाण्यासाठी या नेत्यांना पक्षनिधी द्यावा लागेल. त्याच्यावर विश्वास बसल्याने इंद्रकला यांनी त्याला पैसे देणे सुरू केले.
एका व्यासायिकाचीही केली फसवणूक

इंद्रकला यांनी त्यांच्याकडे असलेली जागा विकून आणि मालकीहक्काची इमारत गहाण ठेवून ३.७७ कोटी रुपये युवराजला दिले. त्यानंतरही युवराजने पुन्हा पैसे मागितले. यानंतर इंद्रकला यांनी कर्जाने पैसे घेत युवराजला ४.५० कोटी रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर युवराजने इंद्रकला यांच्याशी असलेला संपर्क तोडून टाकला. युवराजने आपल्याला सरकारी पद मिळवून दिलं नाही, पैसे घेतले आणि आता तो उत्तरही देत नाही हे इंद्रकला यांच्या उशिराने का होईना पण लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. इंद्रकला यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीच्या घरी छापा मारला. यावेळी त्यांना 26 लाखांची रोकड आणि ९१ कोटी रुपयांचे युवराजच्या नावाने असलेले चेक सापडले. तपासादरम्यान युवराजविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांना कळालं. मुंबईतील एका व्यावसायिकाला जमिनीचा वाद सोडवण्याच्या बदल्यात त्याने १० कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणी युवराजने जून आणि डिसेंबर २०२० मध्ये अटकपूर्व जामीन मिळवला होता.