केरळ  विमान अपघात ;  महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान (AIR INDIA Express Plane) घसरलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , या घटनेत महाराष्ट्रातील वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. निधनाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून हे विमान कालिकत येथे आलं होतं. केरळमधील या विमान अपघातात १४ जण ठार तर १२३ जखमी झाले आहेत. १५ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती मलप्पूरमच्या पोलीस अधीक्षकांनी दिलीय.याबाबत  एएनआयने हे वृत्त दिलं आहे  अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

विंग कमांडर साठे हे एअर इंडियामध्ये जाण्यापूर्वी आयएएफमध्ये पायलट होते. पावसाळ्याच्या वातावरणामुळे हे विमान कोसळले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी आता मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. केरळमध्ये कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँड करत असतानाच ही घटना घडली. धावपट्टीवरुन हे विमान घसरलं आणि एका छोट्या दरीत कोसळलं.दरम्यान या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.