कोरोना काळात मुलाने केलंय ‘हे’ काम, बापासाठी आयसीयुतील बेड केला रिकामा; तुम्हीही म्हणाल प्रत्येकाने याचा आदर्श घ्यायलाच हवा

९ एप्रिल रोजी मयंक यांची तब्येत बिघडली होती. यानंतर १७ एप्रिल रोजी त्यांना नोएडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या वडिलांचीही प्रकृती बिघडली. त्यांचे ऑक्सिजनही खालावू लागले. जेव्हा त्यांच्या वडिलांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही तर मयंकने आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला.

    नोएडा : नोएडामध्ये एका ३८ वर्षीय आजारी मुलाने कोरोना संसर्ग झालेल्या आपल्या वडिलांसाठी बेड सोडून दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. मयंक प्रताप सिंहचे वडील उदय प्रताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मात्र दुर्देवाने त्यांना रुग्णालयात बेड मिळत नव्हता. यानंतर नोएडा कोविड रुग्णालयात दाखल त्यांचा मुलगा मयंकने वडिलांसाठी आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला. मयंक स्वत: कोरोनाबाधित आहेत. आता ते घरात उपचार घेत आहेत.

    १७ एप्रिलला दाखल झाले होते मयंक

    ९ एप्रिल रोजी मयंक यांची तब्येत बिघडली होती. यानंतर १७ एप्रिल रोजी त्यांना नोएडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या वडिलांचीही प्रकृती बिघडली. त्यांचे ऑक्सिजनही खालावू लागले. जेव्हा त्यांच्या वडिलांना कुठेच बेड उपलब्ध झाला नाही तर मयंकने आपला बेड सोडण्याचा निर्णय घेतला. मयंकने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, माझा आरटी-पीसीआर रिपोर्ट १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. ६ दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध झाला.

    वडिलांची तब्येत बिघडत होती

    मयंकने सांगितलं की, जेव्हा माझी तब्येत बिघडली तेव्हा मला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. माझा उपचार सुरू झाला आणि मी १० दिवसांपर्यंत रुग्णालयात दाखल होतो. माझा ऑक्सिजन लेव्हल स्थिर झाल्यानंतर मला वडील आजारी असल्याचं कळालं. माझ्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती. आणि ऑक्सिजनची पातळीदेखील खालावत चालली होती.

    आम्ही रुग्णालयात बेड शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र बेड उपलब्ध झाला नाही. यानंतर मयंकने सीनियर डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की, मला अशक्तपणा आहे, पण मी आता बरा आहे. मला बेड रिकामी करण्याची इच्छा आहे. याची गरज माझ्या वडिलांना अधिक आहे. यानंतर २७ एप्रिल रोजी त्यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मयंकचे वडील अद्यापही आयसीयूमध्ये आहेत.