भाजप खासदार रामस्वरुप शर्मा यांचा मृत्यू; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, वाचा सविस्तर

रामस्‍वरूप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत होते. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  शिमला : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार क्षेत्रातील भाजप खासदार रामस्‍वरूप शर्मा यांचं आज दिल्‍लीतील रुग्णालयात आजारानं निधन झाल्याचं वृत्त सकाळी प्रसारित झालं होतं. मात्र आता प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. खासदार रामस्वरुप शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

  यामुळे रामस्वरुप यांचं निधन आजारानं झालं की, ती आत्महत्या आहे या दिशेने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, रामस्वरुप शर्मा यांच्या निधनानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.

  रामस्‍वरूप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत होते. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र बुधवारी अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि सर्वांना धक्का बसला. मात्र आता याबाबतची नवी माहिती समोर आली असून याबातमीने सारे स्तब्ध झाले.

  दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमती इमारतीच्या स्टाफकडून त्यांना सकाळी एक कॉल आला. रामस्वरुप यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. कडी तोडून आत शिरल्यावर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला असल्याचं सांगण्यात आलं.

  रामस्‍वरूप शर्मा हे मंडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले होते. शर्मा हे मूळ मंडी जिल्ह्यातील जोगेंद्रनगर येथील रहिवासी होते. संघटनेच्या कार्यात ते आधीपासूनच सक्रीय होते.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दादरा नगर हवेलीचे भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्विट

  रामस्वरुप शर्मा यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. रामस्वरुप शर्मा यांच्या आकस्मिक निधनाने व्यथित झाल्याचं ते म्हणाले.