मेहबुबा मुफ्तींची १४ महिन्यांनंतर सुटका

जम्मू काश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या मेहबुबा मुफ्तींची सुटका झाली आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या स्थानबद्धतेबाबत सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जम्मू काश्मिरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री (Ex. Chief minister) आणि पीडीपी (People’s Democratic Party) च्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbuba Mufti) यांची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. गेल्या चौदा महिन्यांपासून त्यांना स्थानबद्ध(Detention) करण्यात आले होते. त्यांच्या स्थानबद्धतेबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होण्यापूर्वीच त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मात्र त्यांच्या सुटकेमागे काय कारण आहे, हे मात्र सरकारने स्पष्ट केलेले नाही.

      या निर्णयानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी समर्थकांचे आभार मानत एक संदेश ट्विट केला आहे.

 मागच्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले होते. या निर्णयाच्या एक दिवस आधी ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी ताब्यात घेण्यात आले होते. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सुरुवातीला त्यांना चेश्मा शाही अतिथीगृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी दुसऱ्या अतिथीगृहात करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या घराला उपतुरुंग घोषित करण्यात आले आणि तिकडे त्यांची रवानगी करण्यात आली. गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. मेहबुबा यांच्या कन्या इल्तिजा यांनी त्यांच्या स्थानबद्धतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २९ सप्टेंबरला त्यावर एक सुनावणीदेखील झाली होती. पुढची सुनावणी गुरुवारी म्हणजेच १५ ऑक्टोबरला होणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला.