kutubminar

कुतुबमिनार परिसरात उभी असलेल्या कुव्वत उल इस्लाम ही मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा एका याचिकेतून करण्यात आला आहे. हे सिद्ध करणारे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध असल्याचा दावाही याचिकेत करण्यात येत आहे.

दिल्ली: कुतुबमिनार(kutubminar) परिसरातील मशिदीविरोधात दिल्लीच्या साकेत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील हरिशंकर जैन यांच्याकडून या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. कुतुबमिनार परिसरात उभी असलेल्या कुव्वत उल इस्लाम ही मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. हे सिद्ध करणारे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध असल्याचा दावाही याचिकेत करण्यात येत आहे. दरम्यान, अयोध्येत राम जन्मभूमी जमिनीचा खटला जिंकल्यानंतर आता काशी आणि मथुरेतही हिंदू संघटना सक्रीय झाल्या आहेत.

मंदिरांच्या पुनर्स्थापनेची मागणी
या मशिदीसाठी पाडण्यात आलेली मंदिरे पुन्हा उभारून या स्थळावर विधीपूर्वक २७ देवी-देवतांची पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. हरिशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी जैन तीर्थकर ऋषभ देव आणि भगवान विष्णू यांच्या नावाने ही याचिका दाखल केली. अनुच्छेद २५ आणि २६ नुसार मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार मंदिरांच्या पुनर्स्थापनेसाठी ही याचिका दाखल करत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

पुढची सुनावणी २४ डिसेंबरला
दरम्यान, दाखल करण्यात आलेली ही याचिका लांबीने मोठी असल्यामुळे आणि त्यात करण्यात आलेल्या दाव्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान सांगितले. या प्रकरणात पुढची सुनावणी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. १३ व्या शतकात उभारण्यात आलेले कुतुबमीनार युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.