खासदार, आमदारांना सर्वात आधी कोरोना लस द्या- खट्टर सरकाराचे आरोग्य मंत्रालयाला पत्र

हरयाणा सरकाने लस आल्यानंतर सर्वात आधी ती माननीय अशा व्यक्तींना देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आरोग्य मंत्रालयाला लिहिले आहे. हरयाणा राज्यातील खासदार आणि आमदार यांना ही लस आधी देण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे.

कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. त्याचीच तयारी म्हणून केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेबाबत राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाकाळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी देण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र हरयाणा सरकाने लस आल्यानंतर सर्वात आधी ती माननीय अशा व्यक्तींना देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आरोग्य मंत्रालयाला लिहिले आहे. हरयाणा राज्यातील खासदार आणि आमदार यांना ही लस आधी देण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे. खासदार आणि आमदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे ते लोकांना नेहमीच भेटत असतात. म्हणून कोरोना लसीकरणाच्या यादीमध्ये त्यांना स्थान द्यायला हवे, असे खट्टर सरकारने लिहिलेल्या या पत्रात नमूद केले आहे.

हरयाणा राज्यात सध्या १० खासदार आहेत. यातील तीन खासदार हे केंद्रात मंत्री आहेत. राज्यात विधानसभेचे ९० आमदार तसेच पाच राज्यसभेचे खासदार आहेत. आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात खट्टर सरकारने पहिल्यांदा खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र यामध्ये महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यासारख्या लोकांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केलेला नाही.