मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ अखेर पूर्ण होणे अशक्यच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग कोविड १९ साथीमुळे मंदावला आहे. ही रेल्वे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण आता ते शक्य होणार नाही. करोना साथीमुळे निविदा, जमीन अधिग्रहण यात खंड पडला आहे.

दी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, आम्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेपैकी ६३ टक्के जमीन अधिग्रहित केली आहे. गुजरातमध्ये ७७ टक्के, दादरा नगर हवेलीत ८० टक्के, महाराष्ट्रात २२ टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पालघर व गुजरातमध्ये नवसारी येथे जमीन अधिग्रहणात अडचणी आहेत. गेल्या वर्षी दी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर नऊ निविदा निघाल्या पण करोनामुळे त्या उघडल्या गेल्या नाहीत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितले की, कोविडमुळे निविदा उघडल्या गेल्या नाहीत. प्रकल्पावर कोरोना साथीचा काय परिणाम होईल हे आताच सांगणे अवघड आहे, कारण कोरोना किती दिवस चालणार हे माहिती नाही. या प्रकल्पाची पूर्तता मुदत २०२३ आहे. जपानी येनच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पाची किंमत सध्या १.०८ लाख कोटी असली तरी ती आता १.७० लाख कोटी झाली आहे.

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले की, येत्या तीन ते सहा महिन्यात जमीन अधिग्रहणाची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट झाल्यानंतर या प्रकल्पाची नवी कालमर्यादा निश्चित केली जाईल.