संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची(Amit Shah) सदिच्छा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची(Amit Shah) सदिच्छा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जन आशिर्वाद यात्रे(Jan Ashirwad Yatra) दरम्यान २३ ऑगस्ट रोजी राणेंच्या अटकनाट्यानंतर पहिल्यांदाच दोघांमध्ये भेट आणि चर्चा झाल्याचे या सूत्रांनी सांगितले. नारायण राणे यांची ही सदिच्छा भेट होती, त्यांनी गणेशोत्सवा दरम्यान शहा यांना व्यक्तिश:  गणेश दर्शनासाठी निमंत्रण दिल्याचे या सूत्रांचे मत आहे.

    प्रकृती अस्वास्थ असतानाही जनआशीर्वाद यात्रा पूर्ण केली
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर, भाजप नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. मात्र राणे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे सांगत त्यांच्या अटकेबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ओबीसी प्रश्नावरील बैठकीनंतर बंद व्दार चर्चादेखील झाली होती. त्यावेळी राणेंना संगमेश्वर येथे नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर राणे यांनी प्रकृती अस्वास्थ असतानाही जनआशीर्वाद यात्रा पूर्ण केली होती.

    घडामोडीबाबत व्यक्तिगत चर्चा फारशी नाही
    आता राणे अमित शहा यांच्या भेटीत या घडामोडीबाबत व्यक्तिगत चर्चा फारशी झाली नसल्याचे सूत्रांचे मत आहे. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयात राणे-शहा यांच्या भेटीमुळे राज्य सरकारने केलेली कारवाई कशी अयोग्य होती आणि त्याबाबत संबंधितांवर कारवाईची मागणी राणे यांच्याकडून करण्यात आल्याबाबत माहिती नसल्याचे या सूत्रांनी सांगितले. राणे यांच्या मंत्रिपदानंतर मात्र शिवसेना आणि भाजपातील संघर्ष रस्त्यावर आल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अमित शहा राणे यांना कश्या प्रकारे शक्ति देतात ते लवकरच दिसून येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.