नॅशनल हेरॉल्ड केस : काँग्रेसच्या अडचणीत भर ; सोनिया, राहुल गांधींना हायकोर्टाची नोटीस

कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी सादर केलेल्या प्रमुख साक्षिदारांच्या आधारावर यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच अन्य व्यक्तींवर खटला चालवण्यास नकार दिला होता. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता उच्च न्यायालयाचे न्या. सुरेश कैत यांनी या प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया यांना १२ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

    दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगित केली असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह ५ जणांना नोटीस बजाविली आहे. उच्च न्यायालयाने भाजपा खासदार सुब्रमण्यन स्वामी यांच्या याचिकेसंदर्भात या नोटीसद्वारे उत्तरही मागितले आहे.

    खटला चालविण्यास कनिष्ठ न्यायालयाने दिला होता नकार
    कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी सादर केलेल्या प्रमुख साक्षिदारांच्या आधारावर यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच अन्य व्यक्तींवर खटला चालवण्यास नकार दिला होता. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता उच्च न्यायालयाचे न्या. सुरेश कैत यांनी या प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया यांना १२ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांचे वकील सत्या सभरवाल तसेच गांधी परिवार व अन्य व्यक्तींचे वकील तरन्नूम चिमा यांनी उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी १२ एप्रिलपर्यंत स्थगित झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    फसवणुकीचे आरोप
    स्वामी यांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत सोनिया आणि राहुल गांधींसह अन्य व्यक्तीवर फसवणूक करणे आणि अयोग्य मार्गाने पैसा कमावण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर आरोप करण्यात आले आहेत. या सातही जणांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.