इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी संप, ‘या’ सेवा फक्त राहणार सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा (IMA) आज देशव्यापी संप असून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ओपीडी बंद राहणार आहेत. परंतु कोरोना सेंटर आणि रूग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर काही सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सिंघु सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. परंतु हे आंदोलन सुरू असतानाच डॉक्टरांनी सुद्धा विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाला आता हाक दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा (IMA) आज देशव्यापी संप असून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ओपीडी बंद राहणार आहेत. परंतु कोरोना सेंटर आणि रूग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तर काही सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.

आयुर्वेदिक पदव्युत्तर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आयएमएने संप जाहीर केला आहे. देशव्यापी संपादरम्यान ICU आणि CCU सेवा वगळता ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत त्या सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर घेतलेल्या अपॉईंटमेंट आणि आज होणाऱ्या शस्त्रक्रियादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.

आयुर्वेद डॉक्टर सामान्य आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सोबतच नेत्र, कान, घसा शस्त्रक्रिया देखील करू शकतील. असे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (CCIM) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.