आता रेल्वे प्रवासात बोअर होणंच शक्य नाही, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी येतेय ‘ही’ सुविधा

रेल्वेमध्ये आता बहुप्रतिक्षीत कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवेला सुरुवात होणार आहे. या सेवेमध्ये प्रवाशांना विविध भाषांमधला प्रिलोडेट कंटेंट उपलब्ध होणार आहे. यामध्ये चित्रपट, संगीत व्हिडिओ, बातम्या, माहितीपट आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यासाठी रेल्वेशी संबंधित रेलटेल ही कंपनी कार्यरत असून याची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

    रेल्वे प्रवास हा सर्वात स्वस्त, जलद आणि सुरक्षित प्रवास मानला जातो. देशातील कोट्यवधी नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र अनेकदा लांब पल्ल्याचे हे प्रवास कंटाळवाणे होतात. तासनतास चालणाऱ्या प्रवासात करायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. प्रवासात बऱ्याचदा इंटरनेटही मिळत नाही. या समस्येवर आता रेल्वेनं आता एक रामबाण उत्तर शोधलंय

    रेल्वेमध्ये आता बहुप्रतिक्षीत कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवेला सुरुवात होणार आहे. या सेवेमध्ये प्रवाशांना विविध भाषांमधला प्रिलोडेट कंटेंट उपलब्ध होणार आहे. यामध्ये चित्रपट, संगीत व्हिडिओ, बातम्या, माहितीपट आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. यासाठी रेल्वेशी संबंधित रेलटेल ही कंपनी कार्यरत असून याची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

    प्रवाशांना अखंड मनोरंजन उपलब्ध व्हावं आणि बफरची समस्या येऊ नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात मीडिया सर्व्हर ठेवले जाणार आहेत. त्यामुळे प्रवासी त्यांच्या डिव्हाईसमध्ये बफर फ्री सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा कंटेट थोड्या थोड्या दिवसांनी सातत्यानं अपडेट केला जाणार आहे.

    देशातील वाय-फाय असणाऱ्या ५ हजार ९५२ रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू होणार आहे. ५ हजार ७२३ उपनगरीय रेल्वेमध्येही ही सेवा उपलब्ध होईल. सध्या एका राजधानी एक्सप्रेसमध्ये आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकुलीत एसी लोकलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आलीय आणि ती परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही सेवा देशभर सुरू होईल, असं सांगितलं जातंय.

    या सेवेतून मिळणारा नफा रेलटेल आणि रेल्वे यांच्यात समसमान वाटला जाणार आहे. या सुविधेतून कमीत कमी ६० कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.