सोने तस्करीसाठी लढविली नवी शक्कल; महिलेच्या बेल्टमधून १ कोटींचे सोने जप्त

रेल्वे पोलिसांनी शमद आणि त्याची महिला साथीदार अफरोज आमिर उल्लाह या महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेकडे सोन्याची दोन, तर तरुणाकडे सोन्याचे एक बिस्कीट सापडले.

पटणा. सोने तस्करीसाठी तस्कर नानाविध शक्कल लढवित असतात. आजवर सोने तस्करीची प्रकरणे ही कुणाच्या बुटात तर कोणाच्या पोटातच काय बॅगमधील चामड्यातही सोने लपविल्याचे उघड झाली आहे. अशीच एक कारवाई पाटणा येथे करण्यात आली. आरपीएफ आणि डीआरआयने पाटलीपुत्र रेल्वे स्थानकात संयुक्तपणे सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका एक्स्प्रेसमधून एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. दोघेही आरोपी मुंबईतील राहणारे आहेत. तस्करीचे सोने आसामला घेऊन जात असतानाच ही कारवाई केली.

आंतराष्ट्रीय तस्करांसोबत संबंध असल्याचा संशय

डीआरआयच्या सूचनेनुसार, आरपीएफने महिलेची झडती घेतली. त्यावेळी महिलेच्या कंबरेला लावलेल्या बेल्टमधून एक कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. हे दोघे सोने तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्या बाजूनेही तपास सुरू आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

महिलेसह एकास अटक
रेल्वे पोलिसांनी शमद आणि त्याची महिला साथीदार अफरोज आमिर उल्लाह या महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेकडे सोन्याची दोन, तर तरुणाकडे सोन्याचे एक बिस्कीट सापडले. त्यांची चौकशी केली असता, दोघेही मुंबईचे असल्याची माहिती मिळाली. या तस्करीत मोठी टोळी सक्रीय असावी असा अंदाज आहे. त्यांची चौकशी केली जात असून, सोने तस्करांच्या टोळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.